Jasprit Bumrah Wicketless : जसप्रीत बुमराहला नेमकं झालंय काय? कारकिर्दीतील सर्वात भीषण फॉर्मचा सामना; ‘या’ एका चुकीमुळे बसतोय फटका
Jasprit Bumrah Wicketless : आपल्या भेदक यॉर्कर आणि धारदार गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा बुमराह या मोसमात चक्क 'विकेटलेस' राहिल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यामागे नक्की कारण काय? जाणून घेऊया

Jasprit Bumrah Wicketless IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची अवस्था बिकट असतानाच, जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्पा पाहायला मिळत आहे. या हंगामात आतापर्यंत पाच सामने खेळूनही बुमराहला एकही विकेट्स मिळवता आलेली नाही. पंजाब किंग्स, आरसीबी, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर विरुद्धच्या सामन्यात त्याने गोलंदाजी केली, मात्र विकेट्सनी त्याला सातत्याने हुलकावणी दिली आहे.
धावांची खैरात अन् ‘विकेट्स’चा दुष्काळ –
जसप्रीत बुमराहने या मोसमात आतापर्यंत १६४ धावा खर्च केल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट ८.६३ इतका आहे. आयपीएलच्या धर्तीवर ही आकडेवारी फार वाईट नसली तरी, बुमराहकडून चाहत्यांना आणि संघाला विकेट्सची अपेक्षा असते. बुमराह विकेट घेत नसल्याने मधल्या षटकांत आणि डेथ ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी फलंदाज बिनधास्त फटकेबाजी करत आहेत.
जसप्रीत बुमराह को क्या हो गया है ?#IPL #JaspritBumrah pic.twitter.com/LDWUwCwFJy
— SOURAV RAJ (@souravreporter2) April 13, 2026
जसप्रीत बुमराह नक्की चुकतोय कुठे?
विश्लेषकांच्या मते, बुमराहच्या बॉलिंग प्लॅनमध्ये झालेला बदल त्याच्या अंगाशी येत आहे. या हंगामात बुमराह त्याच्या एकूण चेंडूंपैकी चक्क ४४% चेंडू हे ‘स्लोअर डिलिव्हरी’ (कमी वेगाचे) टाकत आहे. यामुळे त्याच्या गोलंदाजीचा सरासरी वेग १३० किमी प्रतितास इतका कमी झाला आहे. सातत्याने स्लोअर चेंडू येत असल्याने फलंदाज आधीच तयार राहत आहेत. जर त्याने आपल्या नैसर्गिक वेगाचा (पेस) वापर जास्त केला, तर त्याचे स्लोअर चेंडू अधिक प्रभावी ठरू शकतात.
दुसरीकडे, आता फलंदाजांच्या मनात बुमराहची भीती उरलेली नाही. पूर्वी जे फलंदाज बुमराहचे षटक केवळ खेळून काढायचे, तेच आता न डगमगता त्याच्याविरुद्ध मोठे शॉट्स खेळताना दिसत आहेत. मुंबईला प्ले-ऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर बुमराहला आपला जुना अवतार पुन्हा धारण करावाच लागेल





