IND vs AUS 3rd Test : चौथ्या दिवशी पाऊस पुन्हा खलनायक ठरणार का? जाणून घ्या, ब्रिस्बेनमध्ये उद्या कसं राहिल हवामान…

IND vs AUS 3rd Test 4th Day Weather Report : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमधील गाबा येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तिसरी कसोटी खेळली जात आहे. सामन्याचे तीन दिवस पूर्ण झाले असून, त्यात दोन दिवस (पहिला आणि तिसरा) पावसाने चाहत्यांचा हिरमोड केला.
पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ 13.2 षटकेच खेळता आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण खेळ झाला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा पावसाने दणका दिला. अशा स्थितीत आता चौथ्या दिवशीही पावसामुळे खेळ खराब होणार का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. चला तर मग जाणून घेऊया, चौथ्या दिवशी ब्रिस्बेनमध्ये हवामान कसे असेल.
तिसऱ्या दिवशी पावसामुळे केवळ 33.1 षटकांचा खेळ होऊ शकला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे जवळपास आठ वेळा खेळ थांबवण्यात आला. सततच्या पावसामुळे खेळाडूंना खेळावर जास्त लक्ष केंद्रित करता आले नाही.
खेळाच्या चौथ्या दिवशी कसे असेल हवामान?
गाबा कसोटीच्या चौथ्या दिवशी ब्रिस्बेनमध्ये पावसाचा कहर होऊ शकतो. Accuweather नुसार, कसोटीच्या चौथ्या दिवशी पावसाची जवळपास 100 टक्के शक्यता आहे. अशा स्थितीत चौथ्या दिवशी पूर्णपणे पावसाचे वर्चस्व राहिल असे दिसते आणि चौथा दिवस पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान 31 अंशांच्या आसपास आणि किमान तापमान 25 अंशांच्या आसपास राहू शकते. दिवसभरात ताशी 15 किमी वेगाने वारेही वाहू शकतात.
भारतीय संघ अडचणीत….
आतापर्यंत पूर्ण झालेल्या तीन दिवसांच्या खेळात टीम इंडिया पूर्णपणे अडचणीत दिसत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 445/10 धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने तिसऱ्या दिवसअखेर भारताची धावसंख्या 4 बाद 51 धावा केल्या आहेत. यावेळी केएल राहुल 33 धावा करून तर रोहित शर्मा खाते न उघडता खेळत आहे.





