IND vs AUS 2nd Test : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, मात्र ‘या’ एका खेळाडूच्या फिटनेसवर शंका…

IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे, त्यातील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. ॲडलेडमध्ये होणारा सामना दिवस-रात्र स्वरूपाचा कसोटी सामना असणार आहे. दरम्यान, पर्थ येथे झालेल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला 295 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या भारताविरुद्ध 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने पर्थमध्ये निवडलेल्या 13 खेळाडूंचीच निवड केली आहे. मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी याला दुजोरा दिला आहे. मात्र, मिचेल मार्शच्या गोलंदाजीच्या क्षमतेबाबत अन् त्याच्या फिटनेसबाबत प्रश्नचिन्ह आहे. मार्श दुसऱ्या कसोटीसाठी अनफिट असल्यास, जोश इंग्लिसची संघात वर्णी लागू शकते.
तथापि, मॅकडोनाल्ड म्हणाले, “जो संघ पर्थमध्ये होता तोच संघ ॲडलेडलाही जाईल.” मार्शच्या तंदुरुस्तीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “सध्या आम्ही Wait and Watch च्या स्थितीत आहोत.” याशिवाय अँड्र्यू मॅकडोनाल्डन यांनी सांगितले की, “पुढील सोमवारी संघ ॲडलेडमध्ये एकत्र येईल आणि दुसऱ्या सामन्यासाठी सराव करेल.”
“The same people in that changeroom are the same people that will be in Adelaide,” confirmed coach and selector Andrew McDonald
However, there are some concerns over Mitchell Marsh’s fitness
Full story: https://t.co/iDm2KOho9Q pic.twitter.com/Mg1jgeWyQM
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 26, 2024
दरम्यान, पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मार्शने दोन्ही डावांसह 17 षटके टाकली होती, जी गेल्या तीन वर्षांतील त्याच्याकडून सर्वाधिक गोलंदाजी आहे. तर गेल्या 8 महिन्यांत त्याने फक्त 4 षटके टाकली होती. फलंदाजी करताना पहिल्या डावात स्वस्तात बाद झाल्यानंतर मार्शने दुसऱ्या डावात 47 धावांची खेळी केली होती.
दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ : नॅथन मॅकस्वीनी, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ट्रॅव्हिस हेड, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, मिचेल मार्श, जोश हेझलवूड, नॅथन लियॉन, जोश इंग्लिस, स्कॉट बोलँड.
भारतानं रचला होता इतिहास…
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पर्थमध्ये इतिहास रचला होता. पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. तसेच ऑस्ट्रेलियात भारताने कांगारूंना सर्वाधिक धावांच्या फरकाने पराभूत केले होते. भारताने पहिला सामना 295 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. या सामन्यात जसप्रीत बुमराहने 8 विकेट घेत सामनावीराचा किताब पटकावला होता.





