IND vs AFG 2nd T20I : भारताचा अफगाणिस्तानवर 7 विकेट्सनी दणदणीत विजय; मालिकाही घातली खिशात
आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा टी20 सामना (IND vs AFG 2nd T20I) पार पडला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला.

IND vs AFG 2nd T20I : आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा टी20 सामना (IND vs AFG 2nd T20I) पार पडला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर ७ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत २ -० ने आघाडी घेतली आहे.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आणि अचूक माऱ्यासमोर अफगाणिस्तानचा संघ निर्धारित 20 षटकांत 8 बाद 159 धावांवर मर्यादित राहिला.
अफगाणिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच षटकामध्ये (IND vs AFG 2nd T20I) त्यांचा स्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक रहमानुल्लाह गुरबाज अवघ्या शून्य धावांवर अर्शदीप सिंगचा शिकार ठरला. त्यानंतर सेदीकुल्लाह अटलही 12 धावा करून रवी बिश्नोईच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. या पडझडीच्या काळात कर्णधार इब्राहिम झद्रानने 33 चेंडूत 37 धावांची खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु नितीश कुमार रेड्डीच्या चेंडूवर रवी बिश्नोईने त्याचा उत्कृष्ट झेल घेत अफगाणिस्तानला मोठा धक्का दिला.
मधल्या फळीत गुलबदिन नाइब (10 धावा) आणि अझमतुल्लाह ओमरझाई (11 धावा) स्वस्तात बाद झाले. मात्र, दरविश रसुलीने 15 चेंडूत 26 धावा आणि मोहम्मद नबीने 14 चेंडूत 20 धावा करत संघाची धावसंख्या शंभरीपार पोहोचवली. अखेरच्या षटकांमध्ये स्टार अष्टपैलू रशीद खानने 16 चेंडूत 28 धावांची आक्रमक खेळी खेळून अफगाणिस्तानला 150 धावांचा टप्पा ओलांडून दिला. रशीदला नितीश रेड्डीने बाद केले. डावाच्या शेवटी नूर अहमद 7 आणि मुजीब उर रहमान 4 धावांवर नाबाद राहिले.
यानंतर फलंदाजीला (IND vs AFG 2nd T20I) आलेल्या भारताची सुरुवात दमदार झाली. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. संजूने २२ चेंडूत ५७ धावांची खेळी तर अभिषेक शर्माने १९ चेंडूत ३९ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर ईशान किशनने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत संघाला विजयच्या उंबरठ्यावर नेले. त्याने २३ बॉलमध्ये ३८ धावा केल्या. त्याला श्रेयस अय्यर ( ११) तर तिलक वर्मा १५* यांनी साथ दिली.






