BCB Requests ICC : टी-२० विश्वचषक भारतात खेळण्यास बांगलादेशचा पुन्हा नकार! आता ICC समोर ठेवली ‘ही’ नवी अट

BCB Requests ICC Group Change : आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या वेळापत्रकावरून नवा वाद निर्माण झाला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) भारतात सामने खेळण्याबाबत सुरक्षेच्या कारणास्तव चिंता व्यक्त केली असून, त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्याचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) ठेवला आहे. शनिवारी, १७ जानेवारी रोजी ढाका येथे बीसीबी आणि आयसीसी प्रतिनिधींच्या बैठकीत हा औपचारिक प्रस्ताव देण्यात आला.
नेमकी मागणी काय?
‘क्रिकबझ’च्या अहवालानुसार, बांगलादेशने आयसीसीला विनंती केली आहे की त्यांना ‘ग्रुप बी’ ऐवजी ‘ग्रुप सी’मध्ये समाविष्ट करण्यात यावे. सध्या ‘ग्रुप सी’मध्ये आयर्लंडचा संघ आहे, ज्याचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत.
- बांगलादेशचा सध्याचा गट (Group B): त्यांचे सामने कोलकाता (विंडीज, इटली, इंग्लंड विरुद्ध) आणि मुंबईत (नेपाळ विरुद्ध) होणार आहेत.
- प्रस्तावित बदल: बांगलादेशला आयर्लंडच्या जागी पाठवल्यास, त्यांना कोलंबो आणि कॅंडीमध्ये सामने खेळता येतील.
सुरक्षेचे कारण आणि अधिकृत भूमिका –
बैठकीनंतर बीसीबीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही बांगलादेशचे सामने श्रीलंकेत हलवण्याची विनंती पुन्हा एकदा केली आहे. बांगलादेश सरकारने व्यक्त केलेली सुरक्षाविषयक चिंता, खेळाडूंची सुरक्षा, मीडिया आणि चाहत्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.” आयसीसीसोबत झालेली ही चर्चा अत्यंत सौहार्दपूर्ण आणि व्यावसायिक वातावरणात पार पडली असून, कमीत कमी लॉजिस्टिक बदलांसह हा प्रश्न सोडवण्यावर चर्चा झाली आहे.
मुस्तफिझूर रहमान वादाचा परिणाम?
या वादाची ठिणगी आयपीएलमधील मुस्तफिजुर रहमानच्या प्रकरणावरून पडल्याचे मानले जात आहे. आयपीएल फ्रँचायझीने मुस्तफिझूरला रिलीज करण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला होता, त्यानंतर आता बांगलादेशने भारतात खेळण्याबाबत सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. विश्वचषक सुरू व्हायला काहीच दिवस शिल्लक असल्याने आयसीसी आता यावर काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.





