Dhruv Jurel Century : ध्रुव जुरेलच्या धमाकेदार शतकी खेळीनं वेधलं सर्वांच लक्ष! नाबाद राहत सावरला संघाचा डाव

Dhruv Jurel Century in IND A vs SA A Test Match : भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यातील चार दिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी ध्रुव जुरेलच्या नाबाद १३२ धावांच्या शानदार शतकाच्या जोरावर भारत अ संघाने २५५ धावा उभारल्या. दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि भारत अ संघाला सलामीला उतरवले. मात्र, भारत अ संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि अवघ्या १२६ धावांत सात विकेट्स गमावले. यानंतर जुरेल आणि कुलदीप यादव (२०) यांनी आठव्या विकेटसाठी ७९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
जुरेलचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चौथे शतक –
ध्रुव जुरेलने १७५ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद १३२ धावा फटकावल्या. त्याने ऑफ स्पिनर प्रेनेलान सुब्रायेनला लाँग ऑनवर शानदार षटकार ठोकला, त्यानंतर स्लॉग स्वीपने आणखी एक षटकार मारला. टियान वॅन व्ह्युरेनच्या गोलंदाजीवर एक धाव घेऊन त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चौथे शतक पूर्ण केले. गेल्या सात डावांमध्ये हे त्याचे तिसरे शतक आहे. याआधी त्याने लखनौमध्ये ऑस्ट्रेलिया अ आणि अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शतके झळकावली होती. कुलदीप यादवने ८७ चेंडूंचा सामना करत २० धावा जोडल्या.
भारत अ संघाची टॉप ऑर्डर अपयशी –
Day 1 Stumps:
🇮🇳 India A bowled out for 255 against South Africa A⚡
⭐ Dhruv Jurel stands tall with a brilliant 132(175)*#INDAVsSAA #DhruvJurel pic.twitter.com/fs6GoT0uyC— Cric Insights (@cricinsights1) November 6, 2025
भारत अ संघाची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. ज्यामध्ये साई सुदर्शन (१७), केएल राहुल (१९) आणि कर्णधार ऋषभ पंत (२४) हे सलामीवीर स्वस्तात बाद झाले. दुसऱ्या ओव्हरमध्ये अभिमन्यू ईश्वरन (०) पहिला बळी ठरला. १६व्या ओव्हरमध्ये टियान वॅन व्ह्युरेनने केएल राहुलला बाद करत दुसरा धक्का दिला. लगेचच पुढच्या ओव्हरमध्ये प्रेनेलान सुब्रायेनने साई सुदर्शनला पॅव्हिलियनची वाट दाखवली. देवदत्त पडीक्कल (५), हर्ष दुबे (१४), आकाश दीप (०) आणि मोहम्मद सिराज (१५) हेही मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत.
हेही वाचा – WPL 2026 Retention List : मेगा ऑक्शनपूर्वी बिग ब्रेक! कोणत्या संघाने कोणाला केले रिटेन? पाहा संपूर्ण यादी
दक्षिण आफ्रिका संघाची शानदार गोलंदाजी –
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारत अ संघाला नियमित अंतराने विकेट्स घेतल्या. ७८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर टियान वॅन व्ह्युरेनने प्रसिध कृष्णाला बाद करत भारत अ संघाचा डाव २५५ धावांत संपवला. दक्षिण आफ्रिका संघाकडून टियान वॅन व्ह्युरेनने चार विकेट्स घेतल्या, तर शेपो मोरेकी आणि प्रेनेलान सुब्रायेन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ओकुह्ले सेलेने एक विकेट्स घेतली. जुरेलच्या शतकामुळे भारत अ संघाला अपयशातून सावरता आले.





