IND A vs AUS A : ध्रुव जुरेलचा कांगारुंना शतकी तडाखा; वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी ठोकला दावा

IND A vs AUS A Dhruv Jurel Century : लखनौच्या एकाना स्टेडियमवर भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील सामन्यात ध्रुव जुरेलने शानदार शतकी खेळी करत कांगारू गोलंदाजांना चकित केले. जुरेलने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्व दिशांना फटके खेळत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची हवा काढली. या खेळीच्या जोरावर त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात स्थान मिळवण्याचा मजबूत दावा ठोकला आहे.
ध्रुव जुरेलचा शतकी धमाल –
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जुरेल 132 चेंडूंमध्ये 113 धावांसह नाबाद आहे. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार ठोकले, ज्यामुळे त्याची स्ट्राइक रेट 85.60 इतकी राहिली. ही त्याची दुसरी प्रथम श्रेणी शतकी खेळी आहे. विशेष म्हणजे, जुरेलने देवदत्त पडिक्कलसह 247 चेंडूंमध्ये 181 धावांची नाबाद भागीदारी केली. पडिक्कलने 186 चेंडूंमध्ये 86 धावांसह नाबाद राहून चौथ्या दिवशी शतक पूर्ण करण्याचा इरादा दाखवला आहे.
वेस्टइंडीज मालिकेपूर्वी टीम इंडियात ठोकला दावा –
Dhruv Jurel smashed hundred against Australia A in the 1st unofficial Test 🙌#Cricket #DhruvJurel #INDvAUS pic.twitter.com/iFLHC23PU2
— CricketTimes.com (@CricketTimesHQ) September 18, 2025
आशिया कप 2025 नंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला सामना 2 ऑक्टोबरपासून, तर दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून होणार आहे. या मालिकेपूर्वी जुरेलने आपल्या फलंदाजी आणि यष्टिरक्षणाने भारतीय संघ व्यवस्थापनाचे लक्ष वेधले आहे. यापूर्वी इंग्लंडमध्येही त्याने आपल्या यष्टिरक्षणाने सर्वांना प्रभावित केले होते.
हेही वाचा – Asia Cup 2025 : धक्कादायक! यूएईविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूने अंपायरला मारला चेंडू, VIDEO व्हायरल
दुलीप ट्रॉफीमधून का झाला होता बाहेर?
दुलीप ट्रॉफी 2025 मध्ये ध्रुव जुरेलकडे सेन्ट्रल झोनचे कर्णधारपद देण्यात आले होते. मात्र, डेंग्यूमुळे त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी रजत पाटीदारने कर्णधारपद भूषवले आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले.
हेही वाचा – Sachin Yadav : कोण आहे सचिन यादव? ज्याने नीरज चोप्रा आणि अरशद नदीमला मागे टाकत पटकावलं चौथं स्थान
सामन्याची सद्यस्थिती –
ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिल्या डावात सॅम कॉन्स्टास (109) आणि जोश फिलिप (123) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 536/6 धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात भारत अ संघाने तिसऱ्या दिवसअखेर 403/4 धावा केल्या आहेत. साई सुदर्शनने 124 चेंडूंमध्ये 10 चौकारांसह 73 धावांची खेळी केली, तर नारायण जगदीशनने 64 धावांचे योगदान दिले. आता ध्रुव जुरेलच्या शतकी खेळीने भारत अ संघाला सामन्यात मजबूत स्थितीत आणले आहे. आता चौथ्या दिवशी पडिक्कल आणि जुरेलच्या फलंदाजीवर भारत अ संघाची आघाडी अवलंबून असेल.





