नेवासा – हल्लीच्या काळात मोबाईलद्वारे बँकिंग,ऑनलाईन पेमेंट्स, मनोरंजन, प्रवास तिकीट बुकिंग, शिक्षण आणि ऑनलाइन शॉपिंग अशी अनेक महत्त्वाची विविध कामे सहजरित्या केली जातात. मात्र या कामांसाठी मजबूत आणि स्थिर नेटवर्क कनेक्शन असणे ही आवश्यक आहे. असे असताना भारतीय दुरसंचार निगमच्या मोबाईलधारकांना नेवासा तालुक्यात वेळोवेळी नेटवर्क समस्याच्या अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे स्पर्धेच्या धावत्या युगात बीएसएनएल मोबाईलधारकांना प्रचंड अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने यात तत्काळ सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, अन्य खाजगी नेटवर्क कंपन्यांच्या रिचार्जदरांमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे ग्राहक वर्गातून एकीकडे नाराजी व्यक्त केली जात असतांना अशातच बीएसएनएलकडून ग्राहकांची मोठी अपेक्षा आहेत. परंतु सुविधांच्या अभावामुळे ग्राहकवर्ग वैतागला आहे. मोबाईलधारकांचे अचानक नेटवर्क गुल होत असल्यामुळे ग्राहकवर्ग संतापलेला दिसून येत आहे.