Nagar | शेवगाव-पाथर्डीत अकरा हजार मतदारांची वाढ
शेवगाव, (प्रतिनिधी ) – शेवगाव-पाथर्डी २२२ मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला ११ हजार २८२ मतदारांची वाढ झाली असून, प्रशासनाने नव्याने तीन मतदान केंद्रांची निर्मिती केली आहे.
मतदारसंघा स्त्री मतदार १ लाख ७८ हजार ५९४ पुरुष मतदार १ लाख ९३ हजार ८७६ तृतीयपंथी मतदार ६, युवक मतदार ८ हजार १८३ , दिव्यांग मतदार २ हजार ४६४ , सेनादलात कार्यरत मतदार १०२ असे एकूण मतदार ३ लाख ७२ हजार ४७६ आहेत.
लोकसभेच्या वेळी ३६५ मतदान केंद्र होती. मात्र वाढीव मतदार लक्षात घेऊन विधानसभेसाठी शेवगावात दोन व पाथर्डीत एक असे तीन मतदान केंद्र वाढविण्यात आल्याची माहिती मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे, पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले , निवडणुक नायब तहसीलदार राजेंद्र बकरे उपस्थित होते.
मते यांनी सविस्तर माहिती देतांना सांगितले की, मतदार संघात निवडणूक यंत्रणा राबविण्यासाठी ३५ क्षेत्रीय अधिकारी, ४७२ मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात शेवगाव तालुक्यातील ८ महसूल मंडळ, ११३ महसुली गावे तसेच पाथर्डी तालुक्यात ६ महसूल मंडळ, १०१ महसुली गावांचा समावेश असून निवडणूक प्रक्रिया ही पूर्णपणे शेवगाव तहसील कार्यालयामधून राबवण्यात येणार आहे.
ईव्हीएम ठेवण्यासाठी व सुरक्षेसाठी शेवगाव तहसीलमध्ये स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्र शेवगाव तहसीलदार कार्यालय येथे दि. २२ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत शासकीय सुटीचा दिवस वगळता स्वीकारण्यात येणार आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात आली असून, प्रचार सभा, परवानगी ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
तसेच प्रथम येणाच्या अर्जावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल व त्यानुसार परवानगी देण्यात येणार आचारसंहिताच पालन होण्याच्या दृष्टीने सहा भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत .
तसेच शेवगाव तालुक्यातील कऱ्हेटाकळी तर पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी व चितळवाडी येथे स्थिर पथक नेमण्यात आले आहे. तब्बल ५०० हून अधिक पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे.





