Nagar | लाडक्या बहिणींनी खंबीरपणे उभे राहावे – आमदार माली

शेवगाव (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसह महायुती सरकारच्या कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याच्या कामात स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा स्वयंसेविकांनी चांगले योगदान दिले आहे.
मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे लाडक्या बहिणींनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन आमदार प्रविण माली यांनी केले.
शेवगाव शहरातील आखेगाव रस्त्यावरील स्वराज मंगल कार्यालयामध्ये आ. मोनिका राजळे यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबवणाऱ्या महिलांचा गौरव कार्यक्रमामध्ये आमदार माली बोलत होते.
यावेळी आ. मोनिका राजळे, साहित्यिक संजय कळमकर, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, तहसीलदार प्रशांत सांगडे, प्रभारी गटविकास अधिकारी अजितकुमार बांदल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संकल्प लोणकर,
महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब गडदे, उमेश भालसिंग, आशा गरड, ताराचंद लोढे, भिमराज सागडे, सुजाता फडके, अलका सागडे, उषा कंगणकर, लता कोरडे आदींची मंचावर उपस्थित होती.
आ. राजळे म्हणाल्या की, शेवगाव तालुक्यात ही योजना राबण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मोठा पुढाकार घेतल्याने तालुक्यात ६० हजार ५०० महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता ही योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी महायुतीला मदत करा, असे आवाहनही त्यांनी केले.
कळमकर यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी ६०० महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक भिमराज सागडे यांनी केले तर कचरु चोथे यांनी आभार मानले.





