Nagar | शेवगाव पाथर्डीत 20 जणांचे 25 अर्ज

शेवगाव, (प्रतिनिधी)- शेवगाव पाथर्डी 222 विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारपर्यंत 20 जणांनी 25 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर 65 जणांनी 121 अर्ज घेतले आहेत. सोमवारी (दि.28) रोजी 9 जणांनी 17 अर्ज घेतले आहेत.
तर संदीप गोरक्षनाथ शेलार, हर्षदा विद्याधर काकडे, यशवंत साहेबराव पाटेकर, विद्याधर जगन्नाथ काकडे, सलमान ईसुब बेग, हरिभाऊ काळे, नवनाथ कवडे, गोकुळ विष्णू दौंड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
भाजपच्या आमदार मोनिकाताई राजळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अॅड. प्रताप ढाकणे हे मंगळवारी शक्तीप्रदर्शन करुन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा शेवटचा दिवस असून धनत्रयोदशीचा मुहूर्त असल्याने ऐनवेळी आणखी कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, शेवटच्या दिवशी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील व शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी दिली आहे.
शेवगाव – पाथर्डी 222 विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आमदार मोनिकाताई राजळे, अॅड. प्रताप ढाकणे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. किसण चव्हाण तर अपक्ष म्हणून माजी आमदार चंद्रशेखर घुले, हर्षदा काकडे, दिलीप खेडकर व गोकुळ दौंड या मातब्बर जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून ते उमेदवारी करण्यावर ठाम असल्याने ही निवडणूक बहुरंगी होणार आहे.
