लष्कराकडून नियंत्रण रेषेवरील घुसखोरी रोखण्यासाठी सैन्यदलांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला. सरकारच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानकडून वेगवेगळ्या कुरापती अजूनही सुरू आहेत. त्यातच दोन्ही देशांच्या सीमारेषेवरून भारतात पाकच्या दहशतवाद्यांची घुसखोरीचे प्रयत्न वारंवार होताना दिसत आहेत. पाककडून होणारी हीच घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय लष्कराने मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी लष्कराने नियंत्रण रेषेवरील संख्येत वाढ केली असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतीय लष्कराच्या उत्तरेतील मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी याविषयीची माहिती दिली. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. तरीही पाकिस्तानकडून या भागात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
5 ऑगस्ट रोजी कलम 370 रद्द झाले. त्यानंतर रोजच्या रोज नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या बाजूने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला जात आहे. याच माध्यमातून काश्मीरमध्ये दहशतवादी घुसवण्याचाही पाकिस्तानचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या कारवाया रोखण्यासाठीच आम्ही देशाच्या इतर भागांतूनही लष्कराचे जवान येथे बोलावले आहेत. नियंत्रण रेषा आणि सीमा रेषा याचा कोणताही भाग असा नाही की जिथे जवानांकडून सुरक्षा पुरविली जात नाही.
सर्व ठिकाणी जवान तैनात आहेत आणि ते पाकिस्तानकडून होणारे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडत आहेत, असेही त्यांनी सांगितले. या भागात नक्की किती सैन्यदल तैनात आहे, याबद्दल सविस्तरपणे कोणतीही माहिती देण्यास लष्कराने नकार दिला आहे. पण या सर्व घडामोडींशी संबंधित काही अधिकाऱ्यांनी सांगितले की नियंत्रण रेषेवरील जवानांची संख्या हजारोंनी वाढविण्यात आली आहे.





