सरकारकडून अन्नधान्य उत्पादनाच्या उद्दिष्टात वाढ

खते व बियाण्याची कमरता भासू दिली जाणार नाही
नवी दिल्ली : भारताकडे सध्या अन्न धान्याचा मोठा साठा असल्यामुळे करोनाव्हायरसच्या परिस्थितीमध्ये नागरिकांना अन्नधान्य पुरविण्यात सरकारला मदत झाली आहे. त्यातील बराच साठा आगामी काही महिन्यामध्ये वापरला जाणार आहे. भविष्यातही अन्नसुरक्षा कायम रहावी याकरिता यावर्षी सरकारने अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट वाढवून 298.3 दशलक्ष टनांचे केले आहे.
कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, गेल्या वर्षापेक्षा 2020-21 या वर्षांमध्ये अन्नधान्याचे उद्दिष्ट 2 टक्क्यांनी वाढवून 298.3 दशलक्ष टन करण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात भारतामध्ये पुरेशा प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यास फारशी अडचण येणार नाही असे ते म्हणाले.
2019-20 मध्ये अन्नधान्याचे उत्पादन 291.95 दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 291 दशलक्ष टनाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. भारतामध्ये खरिपात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते आणि पाऊस चांगला पडणार असल्यामुळे खरिपातील उत्पादन वाढणार आहे. लॉक डाऊन चालू असले तरी शेतीतील बहुतांश कामे चालू आहेत आणि आगामी काळातही चालू राहणार आहेत.
त्यामुळे शेतीच्या उत्पादनावर फारसा परिणाम होणार नाही असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आम्ही ठरविलेल्या उद्दिष्टानुसार खरिपामध्ये 149.92 दशलक्ष टन तर रब्बी हंगामात 148.4 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन होईल. तांदळाचे उत्पादन 117.5 दशलक्ष टन, गव्हाचे उत्पादन 106.5 दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. डाळींचे उत्पादन 25.6 दशलक्ष टन होईल. गळित धान्याच्या उत्पादन उद्दिष्टात मोठी वाढ करून सरकारने या हंगामात 36.64 दशलक्ष टन उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
चालू वर्षांमध्ये पर्जन्यमान 96 ते 104 टक्के होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताचा किंवा बियाण्यांचा तुटवडा भासू नये याकरिता उपाय योजना करण्यात येत आहेत. पुढच्या आठवड्यात बहुतांश वाहतूक सुरू होणार असल्यामुळे त्यात फारशी अडचण येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्यामुळे भारताकडे अन्नधान्याचा अतिरिक्त साठा आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आपण या अडचणीवर मात करू शकलो असे ते म्हणाले.





