पिंपरी | संजय गांधी निराधार योजनेतील महिलांचा लाडकी बहीण योजनेत समावेश करा

पिंपरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र सदरच्या योजनेमधून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना वगळण्यात आलेले आहे.
हे अन्यायकारक असून विधवा या एकल महिला पतीच्या निधनानंतर त्यांचे जीवन संघर्षाचे असून मुलांचे शिक्षण, घर खर्च भागवणे, जिकरीचे होते म्हणून त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आली. हा तर त्यांचा हक्कच आहे म्हणून त्यांचा लाडकी बहीण योजनेतही समावेश करावा अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाने केली.
याबाबत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच कामगार मंत्री यांना तहसीलदारांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. विधवा कष्टकरी घरेलू कामगार महिला संजय गांधी निराधार योजनेत लाभ घेत असल्याने समावेश नाकारण्यात आला आहे.
विधवा, निराधार, घरेलू कामगार कष्टकरी कामगार या महिलांचा सदर योजनेत समावेश करावा त्याही लाडक्या बहिणी आहेत. कष्टकरी कामगार महिलांचे जीवन असुरक्षित असून पतीच्या निधनानंतर त्यांना अनेक संकटाला सामोरे जावे लागते जगण्यासाठी धडपड म्हणून ते कुठेतरी काम शोधतात, मात्र कामाची हमी नसते अशा उपेक्षित, कष्टकरी महिला, घरेलू कामगार सर्व विधवा यांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे त्यांना वगळण्यात आले आहे
ज्यांचे कुटुंब सधन आहे, ज्यांच्या कुटुंबात अनेक व्यक्ती कमावती आहे यांची तुलना विधवा महिलांशी होऊ शकत नाही त्यांची आर्थिक अडचण नेहमीच आहे. संजय गांधी निराधार योजनेतून मिळणारे सहाय्यही कमी असून त्यांची मुले व कुटुंब चालवणे अत्यंत अडचणीचे होत असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी त्यांचाही समावेश करण्यात यावा. महिला अध्यक्षा माधुरी जलमूलवार, समन्वयक माया शेटे, लता गोरे, पूनम वारे, ज्योती पाखले आदी उपस्थित होते.





