पिंपरी | मावळात भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

तळेगाव दाभाडे / वडगाव मावळ, – वातावरणातील बदलानुसार मावळ तालुक्याच्या काही भागात खरीप भात पिकावर करपा आणि कडा करपा व शेंडे करपा रोगाची लागण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी भात पिकावरील कीड रोगाचे व्यवस्थापन करावे,
तसेच प्रतिबंधक उपाययोजना करावी असे आव्हान मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.
मावळ तालुक्यात यावर्षी चांगल्या पावसामुळे भात पीक अतिशय चांगले आलेले असून या भात पिकावर वातावरणातील बदलानुसार रोगराई येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्याने काळजी घेणे गरजेचे आहे.
त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे तसेच कीड रोग तज्ञ डॉ. किरण रघुवंशी व मावळ तालुक्यातील भात संशोधन केंद्राचे कृषी अधिकारी यांच्या समावेत मावळ तालुक्याच्या विविध भागात जाऊन शेतकऱ्यांसह भात पिकाची पाहणी केली.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन –
मावळ तालुक्यात खरीप भात पिकावर येणारे संभाव्य रोग करपा, कडा करपा, शेंडे करपा या रोगाविषयी माहिती शेतकऱ्यांना दिली. त्याची लक्षणे शेतकऱ्यांना समजावून सांगितली. त्यावर कोणकोणती उपाययोजना केली पाहिजे याबाबतही या तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीडरोग व्यवस्थापन शेतकऱ्यांनी करावे, तसेच शेतकऱ्यांनी संभाव्य भविष्यातील रोग प्रतिबंधक औषध फवारणी देखील करावी, असे आवाहन मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले.
पवन मावळातील विविध गावांना भेटी देऊन त्या भागामध्ये शेतकऱ्यांना याविषयी उपाययोजना करण्याची माहिती सांगितली असल्याचे सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय ढोमणे यांनी सांगितले.
कृषी विभागामार्फत गावभेट कार्यक्रम –
भात पिकाची क्रोपसप अंतर्गत गाव भेट कार्यक्रम कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आला होता.
आंदर मावळ भागातील माऊ, वडेश्वर, वहानगाव, कुसवली या गावांना भेट देऊन कृषी विभाग आणि कृषी शास्त्रज्ञ दत्तात्रेय गावडे यांच्या उपस्थितीत भात पिकाची पाहणी करण्यात आली. सध्यस्थित भात पिकावर करपा रोग प्रादुर्भाव असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे उत्पन्नात घट होईल की काय अशी शेतकरी वर्गात चिंता आहे. परंतु चिंता करण्याचे काही कारण नाही.
भात पिकावर वातावरणातील बदलामुळे करपा व कडा करपा या दोन्हींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. यावेळी कृषी विभागातील अधिकारी राजाभाऊ गायकवाड, घनशाम दरेकर, प्रकाश पवार, काळूराम वाडेकर, नाथा चिमटे, तुकाराम लष्करी, नामदेव खांडभोर उपस्थित होते.





