पुणे जिल्हा | सोयाबीनची पेरणीपूर्वक उगवण क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया करा

मंचर, (प्रतिनिधी) – पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या खरीप हंगाम पेरणीसाठी सोयाबीन बियाण्याची पेरणीपूर्वक उगणक्षमता तपासणी करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी घरच्या घरी उगवण क्षमता तपासून घ्यावी, असे आवाहन आंबेगाव तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ यांनी केले.
शेतकऱ्यांना आवाहन करताना नरेंद्र वेताळ म्हणाले, सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासणी करताना घरचे बियाणे चाळणी करून त्यामध्ये काडीकचरा, खराब दाणे, खडे साफ करून घ्यावे.
गोणपाट ओले करून घ्यावे व सोयाबीनचे १०० दाणे घेऊन एका ओळीत १० याप्रमाणे १० ओळी मांडाव्यात. त्यानुसार गोणपाटात मांडणी केलेले दाणे चार-पाच दिवस ओले राखण्याकरता त्यावर दररोज हलके पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर शंभर दाण्यांपैकी किती बियांना मोड आले ते पहावे. गोणपाटाऐवजी आपण कागदाचाही वापर करू शकतो.
कागदाच्या एका कागदास चार घडी पाडून तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा प्रत्येकी १० बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून कागदाच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी अशा रीतीने १०० बियांच्या १० गुंडाळ्या तयार कराव्या नंतर त्या गुंडाळ्या पॉलिथिन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात.
चार दिवसानंतर त्या हळू उघडून पाहून त्यात बीजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात. आपणास जर ७० बियांना अंकुर फुटलेले दिसून आले तर बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के आहे, असे समजावे. त्यानुसार किमान ७० टक्के उगणक्षमता असलेले हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे.
कृषी योजनांचा लाभ घ्यावा
कृषि सहाय्यक नमिता राशिनकर यांनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी सोयाबीन उगवणक्षमता चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी बुरशीनाशक थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे त्यानंतर रायझोबियम २५० ग्रॅम १० किलो बियाण्यास बीज्रक्रिया करावी.
तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ व कृषि पर्यवेक्षक शिवानंद बिराजदार यांच्या सूचनेनुसार कृषि विभागाच्या विविध योजना असून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषि सहाय्यक नमिता राशिनकर यांनी केले.





