पिंपरी | यांत्रिकी पद्धतीने भात लागवडीस शुभारंभ

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात यांत्रिक पद्धतीने भात लागवडीस सुरुवात झाली आहे. यांत्रिक पद्धतीने भात लागवडीचा शुभारंभ मावळ तालुका कृषी विभागाचे कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांच्या हस्ते नुकताच वडेश्वर येथे संपन्न झाला.
मावळ तालुका हा भाताचे आगर असलेला तालुका असून या तालुक्यात या तालुक्यात सुमारे 13 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होणार आहे. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात पिकाचे उत्पादन घेण्यासाठी सुधारित पद्धतीचा व यांत्रिक पद्धतीने अवलंब करून लागवड करावी, असे आवाहन असे कृषी अधिकारी पडवळ यांनी केले आहे.
यांत्रिक पद्धतीने भात लावणी करण्याचा शुभारंभ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी वडेश्वर गावातील वाघमारे यांच्या शेतावर केला. यावेळी मंडल कृषी अधिकारी राजाराम गायकवाड, कृषी पर्यवेक्षक नवीन बोराडे, घनश्याम दरेकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे, तुकाराम लष्करी शेतकरी नामदेव खांडभोर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




