पुणे जिल्हा | बोगस बियाण्याने शेतकरी हतबल

शिरूर, [अरुणकुमार मोटे] – कंपनीने बोगस बाजरीचे बियाणे दिल्यामुळे शिरूर तालुक्यात अनेक गावांमध्ये बाजरी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पंचायत समितीचे कृषी अधिकारी मात्र दुकानदारांकडून वसुलीत मग्न असल्याची चर्चा होत आहे.
तालुक्यातील सविंदणे, कवठे, मलठण, टाकळी हाजी, फाकटे, आण्णापूर, आमदाबाद, पिंपरखेड, काठापूर, जाबूत, न्हावरे .गोलेगाव, आंबळे, निमोणे, पाबळ, जातेगाव, कान्हूर मेसाई आदी अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी पाऊस पडल्यामुळे पेरणी केलेले बाजरी बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
यंदा जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लवकरच पेरण्या केल्या. शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी केली. मात्र, काही ठिकाणी बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्याने उगवणच झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पेरणीसाठी शेतकऱ्यांनी एकरी जवळपास १० ते १५ हजार रुपयांचा खर्च केला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी बियाणे देणारे डिलर, कृषी सेवा केंद्र दुकानदार, कृषी अधिकारी यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्या आहे. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
शिरूर तालुक्यात खरिपाचे एकूण २७ हजार ४३३ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी बाजरीची १९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेते व डिलर यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, आता शेतकरी पंचायत समितीच्या कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.
अनेक गावांतील शेतकऱ्यांनी एका खासगी कंपनीच्या बाजरी बियाण्याची पेरणी केली असल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. या प्रकारानंतर तालुका कृषी विभाग काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या संकटात मोठी वाढ
शिरूर तालुक्यात रोहित्र, विद्युत मोटारी, केबलची चोरी, बिबट्याचे हल्ले, कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, कधी गारपीट तर कधी दुबार पेरणी, आदी आपत्तीमुळे शेतकरी होरपळून निघत आहे.
वर्षभराचे नियोजन करून पीक लागवड करताना दिसत आहे. आता बोगस बियाणांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बळीराजाला दुबार पेरणी करावी लागणार आहे. दुकानदार व कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूकच केली आहे. कृषी सेवा केंद्र व कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत व भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
व्हिजिटच्या नावाखाली लुटीचा ‘सिलसिला’
शिरूर तालुक्यात बोगस बियाणांचा कहर झाला असताना पंचायत समितीचे कृषी अधिकारी काय करतात हा मोठा प्रश्न उभा राहत आहे. हे अधिकारी व कर्मचारी फक्त दुकानदारांकडून व्हिजिटच्या नावाखाली लुटत असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.
यामुळे दुकानदार पुरते वैतागले आहे. युरिया घेताना लिकिंग खते देण्याची सक्तीबाबत ते मात्र मौन बाळगत आहेत. त्यांना फक्त वसुलीचे देणे घेणे असून शेतकऱ्यांविषयी कळवळा राहिला नाही, असा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती घ्यावी. त्यावर बियाणे खरेदी करणाऱ्याचे नाव, पिकाचे व जातीचे नाव, गट क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, विक्रेत्याची सही ई आदी नोंदी असाव्यात. कोणतेही बियाणे घेताना परवानाधारक कृषी केंद्रधारक विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे.
बियाण्याची उगवण क्षमता, शुद्धता, चाचणीची तारीख आदी काळजीपूर्वक वाचावे. प्रमाणित बियाण्याच्या टॅगवर अधिकाऱ्यांची सही असल्याची खात्री करून घ्यावी. कृषी विभागाच्या सूचना शेतकऱ्यांनी लक्षात घ्याव्यात म्हणजे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक होणार नाही. – सिद्धेश ढवळे , तालुका कृषी अधिकारी, शिरूर.





