उत्तर प्रदेशात पोलिसांसमोर भाजप कार्यकर्त्याने केली एकाची हत्या

बलिया – योगी सरकारच्या उत्तर प्रदेश मधील बालियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस अधिकाऱ्यांसमोरच भाजप कार्यकर्त्याने एका व्यक्तीची हत्या केली आहे. धिरेंद्र सिंह असं आरोपीचं नाव असून तो भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे म्हंटलं जात आहे. या घटने मुळे परिसरात एक खळबळ उडाली आहे.
रेशन दुकानांच्या वाटपासाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र सदस्यांमध्ये असलेल्या वादामुळे अधिकाऱ्यांनी बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचवेळी वाद निर्माण झाला आणि गोळीबार करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ सुरू झाली.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या उपविभागीय दंडाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही इतरांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे. तसेच या घटनेत अधिकारी दोषी आढळ्यास त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे.
दरम्यान, पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाच हा प्रकार घडल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. सध्या मुख्य आरोपी धिरेंद्र सिंह हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.





