UP MLC Election : उत्तर प्रदेशात वाराणसी, लखनऊच्या जागा ‘सप’कडे, महाराष्ट्रातही भाजपची महत्वाची जागा गेली, कर्नाटकात काॅंग्रेसला धक्का
UP MLC Election : उत्तर प्रदेश विधान परिषद निवडणुकीत भाजपने 11 पैकी 6 जागा जिंकल्या, तर सपाने 5 जागांवर विजय मिळवला. वाराणसी आणि लखनऊतील निकाल चर्चेत आहेत. बिहारमध्ये जनसुराजने विधान परिषदेत प्रवेश केला.

UP MLC Election : उत्तर प्रदेश विधान परिषद निवडणुकीत भाजपला वाराणसी, लखनऊ आणि काही महत्त्वाच्या जागांवर धक्का बसला आहे. 11 जागांपैकी भाजपने 6, तर समाजवादी पक्षाने (सपा) 5 जागा जिंकल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील शिक्षक आणि पदवीधर दोन्ही जागा सपाने जिंकल्या. लखनऊ पदवीधर मतदारसंघही सपाच्या कांति सिंह यांनी जिंकला. आग्रा शिक्षक आणि प्रयागराज-झांसी पदवीधर जागेवरही सपाचा विजय झाला.
या निवडणुकीत शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी रोजगार, महागाई, पेपरफुटी आणि जुनी पेन्शन योजना यांसारख्या प्रश्नांना महत्त्व दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे हे निकाल 2027च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचा महत्त्वाचा राजकीय संकेत मानले जात आहेत. मात्र, विधान परिषद निवडणुकीतील मतदारांचा वर्ग मर्यादित असल्याने त्यावरून संपूर्ण राज्याचा कल ठरवणे योग्य ठरणार नाही. पुढील वर्षात 2027 फेब्रुवारी, मार्च महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे येथील निकालाकडे राजकीय विश्लेषक वेगळ्या नजरेने पाहत आहे.
यूपीतील विजयी उमेदवार
मेरठ पदवीधर : दिनेश कुमार गोयल – भाजप
मेरठ शिक्षक : श्रीचंद शर्मा – भाजप
आग्रा पदवीधर : डॉ. मानवेंद्र प्रताप सिंह – भाजप
आग्रा शिक्षक : डॉ. आकाश अग्रवाल – सपा
प्रयागराज-झांसी पदवीधर : डॉ. मान सिंह यादव – सपा
लखनऊ शिक्षक : उमेश द्विवेदी – भाजप
लखनऊ पदवीधर : कांति सिंह – सपा
वाराणसी शिक्षक : लाल बिहारी यादव – सपा
वाराणसी पदवीधर : आशुतोष सिन्हा – सपा
बरेली-मुरादाबाद शिक्षक : डॉ. हरी सिंह ढिल्लो – भाजप
गोरखपूर-फैजाबाद शिक्षक : ध्रुव कुमार त्रिपाठी – भाजप
बिहारमध्ये एनडीएला चार जागा; जनसुराजचे खाते उघडले
बिहार विधान परिषद निवडणुकीत आठपैकी चार जागा भाजप-जेडीयू आघाडीने जिंकल्या. जेडीयूचे नीरज कुमार यांनी पटणा पदवीधर, तर भाजपचे सर्वेश कुमार यांनी दरभंगा पदवीधर जागा जिंकली. तिरहुत शिक्षक मतदारसंघातून भाजपचे नरेंद्र प्रसाद सिंह आणि कोसी पदवीधरमधून डॉ. एन.के. यादव विजयी झाले.
दरभंगा शिक्षक मतदारसंघातून जनसुराजचे डॉ. सुरेश प्रसाद राय विजयी झाले. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने विधान परिषदेत प्रवेश केला. पटणा शिक्षक जागा आरजेडीचे डॉ. संजीव कुमार यांनी जिंकली. तिरहुत पदवीधरमधून बंशीधर ब्रजवासी आणि सारण शिक्षक मतदारसंघातून राहुल राज हे अपक्ष उमेदवार विजयी झाले.
बिहारमधील विजयी उमेदवार
पटणा शिक्षक : डॉ. संजीव कुमार – आरजेडी
पटणा पदवीधर : नीरज कुमार – जेडीयू
दरभंगा शिक्षक : डॉ. सुरेश राय – जनसुराज
दरभंगा पदवीधर : सर्वेश कुमार – भाजप
तिरहुत शिक्षक : डॉ. नरेंद्र सिंह – भाजप
तिरहुत पदवीधर : बंशीधर ब्रजवासी – अपक्ष
सारण शिक्षक : राहुल राज – अपक्ष
कोसी पदवीधर : एन.के. यादव – भाजप
महाराष्ट्रातील मतदारसंघनिहाय निकाल –
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव यांना 1,13,840 मते मिळाली. भाजपच्या डॉ. स्मिता योगेश जाधव यांना 1,03,912 मते मिळाली.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित गोविंदराव वंजारी यांना 67,231 मते मिळाली. भाजपचे सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना 63,960 मते मिळाली.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना 85,876 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सतीश भानुदासराव चव्हाण यांना 67,752 मते मिळाली.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना 23,117 मते मिळाली. अपक्ष सचिन नवनाथ सानप यांना 16,347 मते मिळाली.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण रामराव सरनाईक (विजयी) यांना 16,663 मते मिळाली. तर काँग्रेसच्या अदिती ऋषिकेश पोहरे यांना 8,636 मते मिळाली, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
कर्नाटकात भाजप-जेडीएसची चांगली कामगिरी; काँग्रेस मोठा धक्का –
कर्नाटक विधानपरिषद निवडणुकीत भाजप-जेडीएस आघाडीने चारही जागा जिंकत काँग्रेसला मोठा धक्का दिला. भाजपने तीन, तर जेडीएसने एक जागा जिंकली. जेडीएसचे ए. पी. रंगनाथ यांनी बंगळुरू शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार पुट्टण्णा यांचा ९०८ मतांनी पराभव केला. भाजपने उत्तर-पूर्व शिक्षक, दक्षिण-पूर्व पदवीधर आणि पश्चिम पदवीधर जागा कायम राखल्या.





