भाजीपाला विभागात फूल उत्पादक शेतकऱ्यांची लूट

पुणे, दि. 9 -डमी आडत्याने व्हॉट्सऍपर बिल देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार ताजा असतानाच मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात आणखी एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. नवरात्रोत्सव काळात या विभागातील आडतदाराने शेतकऱ्यांकडून भराई व तोलाई वसूल केली आहे. मुळात भाजीपाला विभागात फुलांच्या व्यवहाराची परवानगी नसताना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता तर शेतकऱ्याची लूट थांबणार का बाजार समिती प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सातारा जिल्ह्यातून एक शेतकरी 4 ऑक्टोबर रोजी मार्केट यार्डात 724 किलो फुलं विकण्यासाठी आला. यावेळी त्या शेतकऱ्याने आडत्याकडे 724 किलो झेंडूचा व्यवहार केला. फूल खरेदीनंतर आडत्याने गाडीमधील काही क्रेट खाली केले. त्यानंतर पावती करताना त्याने त्यामध्ये विशिष्ट हमालीची रक्कम नमूद केली. तसेच भराई व तोलाईचे पैसे त्याच्या पैशांतून वजा करत शिल्लक रक्कम शेतकऱ्याकडे सूपूर्द केली. एरवी फूलबाजारात शेतकऱ्यांच्या पट्टीतून हमाली व तीन टक्के अनुषांगिक खर्च वजा करत शिल्लक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते. मात्र, सणासुदीच्या काळात चार पैसे मिळतील या अपेक्षेने फुलं घेऊन आलेल्या शेतकऱ्यावर तरकारी विभागातील आडतदाराने अनावश्यक तोलाई व भराईचा बोजा टाकत लूट केल्याने बाजार समिती प्रशासन खरोखरच शेतकऱ्यांच्या विचार करते का, असा प्रश्न उपस्थित होतो.
मार्केट यार्डात स्वतंत्र फूल विभाग आहे. त्यातच बाजार समितीने शेतकऱ्यांना थेट फुल विक्रीस परवानगी दिली होती. तरीही भाजीपाला विभागात फुलांचा व्यवहार होत आहे, हे दुर्दैवी आहे. सणासुदीच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याने यास्वरुपाचे धोरण अवलंबल्यास बाजार आवारात विस्कळीतपणा येईल. त्यासाठी सणासुदीच्या काळात फुल बाजारातील आडत्यांना अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून शेतकरी अधिक प्रमाणात बाजारात माल विक्रीस आणतील.
– अरूण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशन
फुलमहोत्सवात फुलांची विक्री केली असती, तर शेतकऱ्यांकडून कोणताही अतिरिक्त खर्च घेतला नसता. मात्र, शेतकऱ्याने भाजीपाला विभागातील ओळखीच्या अडतदाराकडे फुलांचा व्यवहार केला. त्यामुळे भराई व तोलाई वसूल करण्यात आली. मात्र, या प्रकरणाची माहिती घेऊन भाजीपाला विभागातील आडत्यांनी केवळ भाजींचीच विक्री करावी, याबाबत समज देण्यात येईल.
– मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.





