“येत्या दोन दिवसात राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाची सगळ्यांना प्रचिती येईल”; उदय सामंत यांचे मोठे वक्तव्य

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षांवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर ही सुनावणी सुरू असून शिवसेनेचा व्हीप मोडल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात एक मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरेंनी राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता बोलून दाखवली आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानावर आता शिंदे गटाकडून मोठे वक्तव्य करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरेंच्या मध्यावधी निवडणूकीविषयी केलेल्या विधानानंतर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची काहीही शक्यता नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांचे विधान फेटाळून लावले आहे. तसेच पुढे बोलताना उदय सामंत यांनी, ‘आमच्याकडे १७० आमदारांचं बहुमत असल्याचा पुनरुल्लेख केला. त्याशिवाय १५ ते २० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे विधान उदय सामंत यांनी केले आहे. सामंत यांच्या या विधानामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? या चर्चांना उधाण आले आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उदय सामंत यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले आहे. याविषयी बोलताना,“लोकशाहीमध्ये आणि मंत्रीमंडळ स्थापन करताना बहुमत महत्त्वाचं असतं. १७० आमदार आमच्याबरोबर आहेत, हे वारंवार आम्ही सांगितलं आहे. अजून १५ ते २० लोक आमच्या संपर्कात आहेत. येत्या एक-दोन दिवसात आपल्याला याची प्रचिती येईल. त्यामुळे मध्यावधी निवडणुका लागण्याची काहीही शक्यता नाही. आपले कार्यकर्ते सैरभैर होऊ नये. निवडणूक आयोगाच्या निकालामुळे आपल्या कार्यकर्त्यांना नैराश्य येऊ नये, म्हणून उद्धव ठाकरेंनी ते विधान केलं आहे.”असे सामंत यांनी म्हटले आहे.





