Hockey India : आगामी काळात ‘ती’ पोकळी भरून निघेल – पी.आर श्रीजेश

Hockey India (PR Sreejesh) :- क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर निवृत्त झाला होता, त्यावेळी देखील एक पोकळी निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर विराट कोहलीने ही पोकळी भरून काढली. मी निवृत्त झाल्यानंतर भारतीय हॉकी संघात ही पोकळी निर्माण झाली आहे, असे मला वाटते. आगामी काळात कुणी तरी गोलरक्षकाची पोकळी भरून काढेल, असा विश्वास भारताचा महान गोलरक्षक पीआर श्रीजेशने बोलताना व्यक्त केला.
भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक असलेल्या पी आर श्रीजेशने ऑलिम्पिकनंतर निवृत्ती घोषित केली होती. त्यानंतर भारतीय संघाने आशियाई करंडक स्पर्धेत देखील विजयाचा झेंडा फडकावला. असे असले तरी देखील भारतीय संघात श्रीजेश निवृत्त झाल्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. श्रीजेशने गोलरक्षण करताना एक चांगला आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे त्या आदर्शापर्यंत पोहोचण्यासाठी युवा गोलरक्षक खेळाडूंना चांगलीच मेहनत करावी लागणार आहे.
HIL 2024 : हॉकी इंडिया लीगचे तब्बल सात वर्षांनंतर पुनरागमन, ‘या’ कालावधी दरम्यान होणार स्पर्धा….
निवृत्तीनंतर श्रीजेश कडे युवा संघाचे प्रशिक्षकपद देण्यात आले आहे. एका कार्यक्रमासाठी आलेल्या श्रीजेशने पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाला की, मी युवा खेळाडूंसाठी एक आदर्श घालून देण्याचा प्रयत्न केला आहे. तेथे पोहचण्याची युवा खेळाडूंची क्षमता आहे, मात्र यासाठी त्यांना चांगल्या कामगिरीसाठी परिश्रम करावे लागणार आहे. आताचे युवा खेळाडू पुरेशी चांगली तयारी करत असल्याने ही, भारतीय संघातील पोकळी निश्चितच भरून निघेल, असे श्रीजेश बोलताना म्हणाला.





