Hockey WC 2026 : वुमन्स हॉकी स्पर्धेत भारत -चीनमध्ये अतितटीची लढत; सामना बरोबरीत सुटला
वुमन्स हॉकी वर्ल्डकप २०२६ मध्ये (Hockey WC 2026) भारत आणि चीन यांच्यात रंगलेला हाय-व्होल्टेज सामना श्वास रोखून धरायला लावणारा ठरला.

Hockey WC 2026 : वुमन्स हॉकी वर्ल्डकप २०२६ मध्ये (Hockey WC 2026) भारत आणि चीन यांच्यात रंगलेला हाय-व्होल्टेज सामना श्वास रोखून धरायला लावणारा ठरला. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा आक्रमक प्रयत्न केला, ज्यामुळे मैदानावर कमालीचा तणाव पाहायला मिळाला.
सामन्याच्या अवघ्या आठव्या मिनिटाला भारताची स्टार फॉरवर्ड नवनीत कौरने उत्कृष्ट मैदानी गोल डागत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली आणि स्टेडियममध्ये जल्लोष उसळला.
मात्र, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूने सर्कलच्या आत चिनी खेळाडूला (Hockey WC 2026) पुश केल्यामुळे पंचांनी थेट चीनला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला.
भारताने क्षणाचाही विलंब न लावता रिव्ह्यू घेतला, पण पंचांचा निर्णय कायम राहिला. चीनच्या झांग यिंगने कसलीही चूक न करता चेंडू जाळ्यात धाडला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधत भारतावर प्रचंड दडपण आणले.
या दडपणाखालीही भारताने चिकाटी सोडली नाही. २५व्या मिनिटाला दीपिकाने घेतलेला जोरदार ड्रॅग-फ्लिक चिनी बचावपटूच्या खांद्याला लागून दिशा बदलत थेट गोलरक्षकाच्या डोक्यावरून नेटमध्ये घुसला आणि भारताने २-१ अशी पुन्हा एकदा रोमहर्षक आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत भारताचे पारडे जड दिसत होते.
परंतु, दुसऱ्या हाफमध्ये चीनने अनपेक्षितपणे अत्यंत आक्रमक (Hockey WC 2026) चाली रचल्या. तिसऱ्या क्वार्टरमध्ये चिनी आक्रमकांनी भारतीय गोलपोस्टवर सलग हल्ले चढवले. या प्रचंड दबावाचा परिणाम ३९व्या मिनिटाला समोर आला, जेव्हा मा निंगने मिळालेल्या पहिल्याच पेनल्टी कॉर्नरचे थेट गोलमध्ये रूपांतर करून २-२ अशी सनसनाटी बरोबरी साधली.
उर्वरित वेळेत दोन्ही संघांनी विजयासाठी सर्वस्व पणाला लावले, पण अखेरपर्यंत कोणालाही विजयी गोल करता आला नाही आणि हा अटीतटीचा थरार बरोबरीत सुटला. भारताचा पुढील महत्त्वपूर्ण सामना आता १८ ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे.






