‘इन द लॅण्ड ऑफ पॉईझन विमेन’

पणजी – गोव्यामध्ये सुरू असलेल्या इफ्फीच्या ‘इंडियन पॅनोरमा’ या विभागात दिग्दर्शिका मंजू बोरा यांचा ‘इन द लॅण्ड ऑफ पॉईझन विमेन’ हा ईशान्य भारतातल्या पांगचेंपा भाषेतला चित्रपट आणि संजय पुरणसिंग चौहान यांनी दिग्दर्शित केलेला ‘बहत्तर हूरे’ हा हिंदी चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटानिमित्त या दोन्ही दिग्दर्शकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
इफ्फीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात इंडियन पॅनोरमा विभागात आपल्या चित्रपटाची निवड होणे हा विशेष अभिमानाचा क्षण आहे, असे मत मंजू बोरा यांनी यावेळी व्यक्त केले. आपल्या चित्रपटातून आपण ईशान्य भारतातील मूळ रहिवाशांचा जगण्याचा संघर्ष, त्यांचे राजकीय स्थान आणि जीवन या सगळ्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
ईशान्य भारतात जवळपास 120 बोलीभाषा बोलणारे लोक आहेत आणि या भाषांशिवाय भारताचे अस्तित्व पूर्ण नाही, असा माझा विश्वास आहे, असे बोरा म्हणाल्या. ईशान्य भारतातल्या अत्यंत दुर्गम भागात भारत-चीन सीमेवर या चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे, असे बोरा यांनी सांगितले. या भागात केवळ 5 हजार लोकांची वस्ती आहे. अत्यंत निसर्गरम्य अशा या प्रदेशात चित्रीकरण करणे अवघड गोष्ट होती, असे त्यांनी सांगितले. भारतीय लष्कराचीसुद्धा आमच्या तंत्रज्ञांना मदत झाली, असा त्यांनी उल्लेख केला.





