मुंबई : राजकारण आणि वैयक्तिक आयुष्य या दोन्ही परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. राजकारण त्याच्या जागी आणि वैयक्तिक आयुष्य त्याच्या जागी. राजकारणात अनेक जण आपली नाती विसरून जातात असे म्हटले जाते, परंतु, या समजला छेद देत आज मुंबईतील बरीच कँडी रुग्णालयात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी त्यांच्या दोन्ही बहिणी आल्याचे पाहायला मिळाले.
राज्यातील राजकारणात मुंडे बंधू भगिनींचे शाब्दिक युद्ध अनेकवेळा आपल्या समोर आले आहे. मात्र आज या दोघांमधील जिव्हाळा जगासमोर आला. भाऊ दवाखान्यात अॅडमिट झाल्याची माहिती कळताच दोन्ही बहिणी पंकजा आणि प्रीतम या दोघी त्यांना पाहायला धावून आल्याचे दिसले.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे प्रकृती अस्वाथ्यामुळे दवाखान्यात भर्ती आहेत. त्यांना भेटायला भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे पोहोचल्या. त्यांनी धनंजय मुंडेंची बराच वेळ भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. भावाची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आला ही चुकीची बातमी आहे. त्यांना भोवळ आली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे. विकनेस आला होता. आता त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. आता ते व्यवस्थित आहेत. आम्ही त्यांना भेटलो आणि बोललो, ते रिकव्हर होत आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला असून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.