पुनावळेत रस्त्यांची अर्धवट कामे खड्डे, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

रावेत : पुनावळे परिसरात सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अंतर्गत रस्त्यांवर सिमेंट क्रांक्रिटचे काम सुरू असल्याने बहुतांश मार्ग हे एकेरी वाहतुकीसाठी खुले आहेत. पर्यायी मार्गावर मात्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
या भागात अनेक नवीन गृहप्रकल्पांचे काम सुरू असून, सिमेंट मिक्सर, डंपर यांसारख्या जड वाहनांची वर्दळ दिवसेदिवस वाढत आहे. टोलेजंग इमारतींमध्ये रहिवासीही आता वास्तव्यास आल्याने वाहतूकीवरील ताण अधिक वाढलेला दिसतो. सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागते.
पुनावळे ते जांभे रस्त्यावरील गायकवाड वस्ती, कोयते वस्ती या भागातील स्वराज सोसायटीसमोरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, वाहतूक कोंडीमुळे शाळकरी मुलांना वेळेवर पोहोचवणे आणि आणणे फारच अवघड झाले आहे. यासोबतच, पादचारी मार्गाचा अभाव आणि रस्त्यावरून जाणाऱ्या धुळीमुळे वृद्ध, महिला व लहानग्यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
“अर्धवट रस्ते, उखडलेले खडीचे मार्ग आणि खड्डे यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. प्रशासनाने रस्त्याचे काम झपाट्याने पूर्ण करून नागरिकांचा दैनंदिन त्रास कमी करावा,” अशी जोरदार मागणी पुनावळेकर करत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका किंवा संबंधित यंत्रणा यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित यंत्रणेला कडक सूचना द्याव्यात आणि रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.





