Ravet Bridge : तो स्वत:ला संपविणारच होता पण…; रावेतच्या पुलावर काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग
Ravet Bridge : 'अंतिम' व्हिडीओ कॉल, धावून आला खाकीतील देवदूत!

पिंपरी – ”आई… मी आता नदीत उडी मारतोय, हा बघ शेवटचा चेहरा…” मोबाइलच्या स्क्रीनवर पोटच्या गोळ्याचा रडवेला चेहरा आणि पार्श्वभूमीला अथांग वाहणारी पवना नदी! तो थरारक व्हिडीओ कॉल पाहून माउलीच्या पायाखालची जमीनच सरकली.
आईने तिकडून हंबरडा फोडला, पण तिचा २० वर्षांचा तरुण मुलगा रावेत येथील लंडन ब्रिजच्या संरक्षक जाळीच्या आत, मृत्यूच्या अगदी जवळ उभा होता. ऑनलाइन जुगाराच्या विळख्यात अडकलेल्या एका तरुणाची ही केवळ कहाणी नाही, तर एका माउलीच्या काळजाचा ठोका चुकवणारा आणि पोलिसांच्या प्रसंगावधानाने मृत्यूला हरवणारा थरार होता.
रावेत पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार आशिष बोटके आणि दशरथ सदगीर हे नेहमीप्रमाणे लंडन ब्रिज परिसरात गस्त घालत होते. अंधारामध्ये पुलाच्या कठड्यावर एक तरुण संशयास्पद अवस्थेत उभा असलेला त्यांना दिसला. त्यांनी कसलाही विचार न करता तात्काळ त्या तरुणाच्या दिशेने धाव घेतली.
तरुण आईशी व्हिडीओ कॉलवर बोलत होता आणि नदीत उडी मारण्याच्या तयारीत होता. परिस्थिती अत्यंत नाजूक होती. जराशी चूक आणि तो तरुण थेट नदीच्या पात्रात कोसळला असता. पोलिसांनी अत्यंत संयम राखला. त्यांनी तरुणाशी संवाद सुरू केला. त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. संवाद सुरू असतानाच, पोलिसांनी त्याचे लक्ष दुसरीकडे वळवले. आणि… एक योग्य क्षण साधून, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पोलिसांनी त्याला मागे ओढले. मृत्यूच्या दारातून त्या तरुणाला अक्षरशः खेचून काढण्यात आले.
हा तरुण मूळचा बुलढाण्याचा असून सध्या हिंजवडीतील लक्ष्मी चौकात राहतो. मोबाइलवरील ऑनलाइन जुगाराच्या नादापायी त्याने तब्बल १५ हजार रुपये गमावले होते. या आर्थिक फटक्यामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. इकडे आई मुलाचा जीव वाचवण्यासाठी रावेतच्या दिशेने धावत सुटली होती. पुलावर पोहोचताच मुलाला सुखरूप पाहून तिने मुलाला घट्ट मिठी मारली. आईच्या डोळ्यांतील ते अश्रू पोलिसांच्या कामगिरीची पावती देत होते.
पोलिसांनी केवळ त्या तरुणाचे प्राणच वाचवले नाहीत, तर पोलीस ठाण्यात आणून त्याचे योग्य समुपदेशन केले आणि त्याला सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. रावेत पोलिसांच्या या संवेदनशील आणि धाडसी कामगिरीमुळे शहरात त्यांचे कौतुक होत आहे. मात्र, या घटनेने ऑनलाइन जुगाराच्या भयंकर व्यसनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
‘मोबाइलवरील ऑनलाइन जुगार आजच्या तरुणाईला उद्ध्वस्त करत आहे. तरुणांनी अशा आभासी खेळांच्या आहारी जाऊ नये. कोणतीही अडचण असल्यास कुटुंबाशी संवाद साधावा.’- ऋषीकेश घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रावेत पोलीस ठाणे
Pune District : संत सोपानकाका पालखीचे बारामती तालुक्यात स्वागत





