मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं भव्य-दिव्य फाईव्ह स्टार हॉटेलचं भूमिपूजन

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे, मुंबई येथे ‘ताज बॅण्डस्टॅण्ड’ हॉटेलचे भूमिपूजन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी टाटा समूह, इंडियन हॉटेल्स कंपनी यांचे नवीन प्रकल्पासाठी अभिनंदन केले. तसेच टाटा समुहाचे सर्वेसर्वा दिवंगत रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला. हे हॉटेल रतन टाटा यांच्या महत्त्वपूर्ण स्वप्नांपैकी एक होते, ते आता प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद होत आहे. या हॉटेलमुळे वांद्रे परिसराच्या सौंदर्यात भर पडेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह नागपूरमध्ये ताज हॉटेल सुरु करावे, ताज हॉटेलच्या सुरुवातीचा प्रवास अतिशय थक्क करणारा आहे, या प्रवासाची सुरुवात प्रत्येक भारतीय नागरिकासाठी प्रेरणादायी आहे. ताज केवळ हॉटेल नसून प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यावेळी मंत्री आशिष शेलार, टाटा समूहाचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन, द इंडियन हॉटेल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी इंडियन हॉटेल कंपनीचे आभार मानतो, मुंबईतील वांद्रे परिसरात इतक्या सुंदर हॉटेलची उभारणी ते करत आहेत. हे हॉटेल रतन टाटा यांच्या जवळ होते, त्यांनी एकदा हॉटेल उभारणीत काही अडचणी येत आहेत, यासंदर्भात मला देखील सांगितले होते. या नव्या हॉटेलच्या प्लॅनिंग आणि डिझाईनमुळे मुंबईच्या सुंदरतेत आणखी भर पडेल. ताज ग्रुपचा महाराष्ट्रात चांगले प्रस्थ आहे, पण ताज ग्रुपचं नागपुरात हॉटेल नाही, माझी इच्छा आहे तुम्ही आजच नगापुरात हॉटेल सुरू करण्याची घोषणा करावी, माझी टाटा ग्रुपचे सीईओ यांना विनंती असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ताज बँडस्टँड हॉटेल’च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी म्हटलं आहे.
पुढे बोलताना म्हणाले, टाटांच्या ताज ग्रुपचं हे हॉटेल 21 व्या शतकातील मोन्युमेंट म्हणून समोर येईल असा मला विश्वास आहे. ताज ग्रुपने हॉस्पिटॅलिटीची व्याख्या बदलली आहे. जगभरातील अनेक देशात ताज ग्रुपचं प्रस्त आहे, तिथं असं वाटतं आपण मुंबई किंवा देशात आहोत. ‘भारत=ताज’ असं परदेशात गेल्यावर वाटतं. या हॉटेलच्या उभारणीसंदर्भात मुंबई पालिकेनं अडचणी सोडवल्या आहेत. पण, स्व. रतन टाटा यांच्या जाण्याआधी हे उभं राहिलं किंवा भूमिपूजन झालं असतं तर त्यांना अधिक आनंद झाला असता, असे म्हणत फडणवीसांनी याप्रसंगी रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला.





