Congress ‘Bharat Jodo Yatra’ : महाराष्ट्रात ‘या’ दोन ठिकाणी ‘भारत जोडो’ यात्रा

मुंबई – कॉंग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रेला आजपासून सुरू झाली. ही यात्रा कन्याकुमारी येथून देशभरात 3570 किमीचा प्रवास करत काश्मीर येथे संपणार आहे. या यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. ही यात्रा देशभरातील विविध राज्यातून जाणार आहे.
अशातच या यात्रेदरम्यान राहुल गांधी महाराष्ट्रातही येणार आहेत. यावेळी ते हिंगोली जिल्ह्यामध्ये 80 किमी प्रवास करतील. याचबरोबर ते जळगाव जामोद आणि नांदेड येथे सभा घेणार असल्याची माहिती कॉंग्रेस नेते माणिक ठाकरे यांनी दिली.
याच अनुषंगाने माणिक ठाकरे हे प्रशिक्षण आणि संबोधन करण्यासाठी हिंगोलीत आले होते. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ठाकरे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार हे जनहिताचे नसून संविधानाच्या विरोधातील आहे.
संविधानाने दिलेले अधिकार संपुष्टात आणणारे सरकार त्या ठिकाणी बसलेले आहे. म्हणून या सरकारला सत्तेपासून बाजूला सारले पाहिजे, ही भूमिका जनतेची असल्याचे त्यांनी सांगितले.





