पुणे : कामथडी ते पाबे (ता. राजगड, जि. पुणे) दरम्यानची सुमारे ४० किलोमीटर लांब ३३ केव्ही पाबे वीजवाहिनीच्या तारा शुक्रवारी (दि. २३) रात्री ११.३० च्या सुमारास तुटल्या. यामुळे ४१ गावे, वाड्या वस्त्यांमधील ६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, भर पावसात महावितरणच्या अभियंत्यांनी व कर्मचाऱ्यांनी जंगलातील चिखल तुडवत, कोल्ह्यांचा हल्ला चुकवून अनेक धोके पत्करत रात्रभर वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शनिवारी (दि. २४) सकाळच्या सुमारास वेल्हा, पाबे, वाजेघर आदींसह ४१ गावे व वाड्यावस्त्यांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. बिघाडाचे स्वरूप महावितरणच्या नसरापूर उपविभागांतर्गत पाबे ३३ केव्ही वीजवाहिनीद्वारे राजगड (वेल्हे) तालुक्यातील पाबे ३३ केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा होतो. या उपकेंद्रातील चार वीजवाहिन्यांद्वारे वेल्हा गाव, पाबे, दापोडी, विंझर, वाजेघर, पाल आदींसह सुमारे ४१ गावे व वाड्या वस्त्यांमधील ६ हजार घरगुती, व्यावसायिक व शेतीपंपांना वीजपुरवठा होतो. शुक्रवारच्या रात्री ११.३० च्या सुमारास ४० किलोमीटर लांबीच्या व पूर्णतः जंगलात असलेल्या पाबे वीजवाहिनीमध्ये बिघाड झाला, ज्यामुळे सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अथक प्रयत्न महावितरणकडून लगेचच बिघाड शोधण्याचे काम सुरू झाले. यात सातारा महामार्गावरील कामथडी येथील निबिड जंगलामध्ये वादळवाऱ्यासह मुसळधार पावसामुळे चार वीज खांबांवरील तारा तुटल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी वीजतारा तुटल्या होत्या, तिथे पोहोचणे अतिशय धोक्याचे व जिकिरीचे होते. भाताच्या खाचरात आणि जंगलातील निसरड्या चिखलामुळे चालणे कठीण झाले होते. मात्र, उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटूळे, वेल्हा शाखेचे कनिष्ठ अभियंता सचिन कुलकर्णी यांनी समीर मुजावर, सूर्यकांत शिंदे, गणेश शिंदे, राहुल भुरूक, रवी कातुरडे, नीलेश शेंडकर, गणेश गायके, अमोल डांगे, चेतन चोरगे, अमोल रणभोरे या १० तंत्रज्ञांसह तारांच्या दुरुस्तीचे काम रात्रीच करण्याचा निर्णय घेतला. या १२ ‘प्रकाशदूतांनी’ भर पावसात जंगलातून पायदळ साधनसामग्री नेत मोबाइल आणि बॅटरीच्या उजेडात तुटलेल्या तारा जोडण्याचे काम मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास सुरू केले. रानडुक्कर आणि कोल्ह्यांचा वावर असल्याने सगळे सावध होते. असे असतानाही, प्रधान तंत्रज्ञ समीर मुजावर यांच्यावर दोन कोल्हे हल्ला करण्याच्या तयारीत असताना दोन-तीन सहकाऱ्यांनी आरडाओरड केली आणि कोल्ह्यांच्या तोंडावर प्रकाशझोत टाकला, ज्यामुळे ते पळून गेले. पाबे वीजवाहिनीच्या तुटलेल्या तारा जोडण्याचे ९० टक्के काम रात्री पूर्ण झाल्यानंतर, सकाळी किरकोळ दुरुस्ती करण्यात आली आणि पाबे ३३ केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरू झाला. त्यानंतर या उपकेंद्रातील चार वीजवाहिन्यांद्वारे सकाळी १०.१५ च्या सुमारास सर्वच ६ हजार घरगुती, व्यावसायिक व शेतीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. तत्पर ग्राहकसेवेसाठी प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीशी झुंज देत वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या या ‘प्रकाशदूतांचे’ पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी कौतुक केले आहे.