निकृष्ट काम झाल्यास ठेकेदारांची गय नको – आमदार भरणे

लाकडी गावातील शेतकऱ्यांचा अभिमान
इंदापूर – तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न यासाठी राज्य सरकारच्या बरोबर जाण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आपण घेतला आहे. ठेकेदार कुणीही असू द्या. त्यांनी जर चांगले काम केलेच नाही तर त्याचे तात्काळ काम थांबवा, अशा सूचना आमदार दत्तात्रय भरणे यांनी केल्या.
लाकडी (ता. इंदापूर) येथे आमदार दत्तात्रय भरणे यांनी नुकताच दौरा केला. यावेळी पत्रकारांशी आमदार भरणे बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार भरणे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील सर्वात कमी पाण्याचा पट्टा म्हणून लाकडी परिसराला ओळखले जायचे. ज्यावेळेस येथील एक एकर शेताची किंमत वीस हजार रुपये होती.
त्यावेळेस मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा संचालक असल्या कारणाने, येथील शेतकरी सुधारला पाहिजे या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती उंचावली पाहिजे या हेतूने, त्या कालावधीत तब्बल 19 हजार रुपये प्रति एकराला कर्ज जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. खऱ्या अर्थाने जिद्द चिकाटी व मेहनत याच्या जोरावर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कर्जाचा बोजा थकवला नाही.
उलट तालुक्यातील शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा, अशी शेती निर्माण केली. त्यामुळे लाकडी गावकऱ्यांचा अभिमान वाटतो. असे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी काढले. भरणे म्हणाले, मला इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी द्यायचे आहे. खऱ्या अर्थाने तालुक्यात पक्के रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. राज्य शासन केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. लाकडी परिसर हा आदर्श शेतकऱ्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो.
गावचा विकास डोळ्यासमोर ठेवून गावातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे. त्यासाठी आगामी काळात होणारी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत, गावची ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास आपण गावच्या विकासासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी देण्याची व्यवस्था करू.
-दत्तात्रय भरणे, आमदार इंदापूर





