…तर आमची शक्ती दाखवून देऊ; जलील यांनी ‘मविआ’ला दिला इशारा

नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारी सुरु केली आहे. एमआयएम महाविकास आघाडीसोबत येण्यास उत्सुक आहे, मात्र अजूनही महाविकास आघाडीकडून एमआयएमला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. यावरून आता एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे.
काय म्हणाले इम्तियाज जलील ?
महाविकास आघाडीच्या नेत्यांची मानसिता अशी झाली आहे की, व्यासपीठावर त्यांना केवळ तीनच खुर्च्या पाहिजे, त्या खुर्च्यांवर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले बसतील. असा टोला जलील यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की आम्हाला जेथे जेथे सक्षम उमेदवार मिळतील, तेथे आम्ही निवडणूक लढणार आहोत. त्यापूर्वी आम्ही भाजपला हरवण्यासाठी प्रत्येक पातळीवर तडजोड करण्यास तयार आहोत, 9 सप्टेंबरपर्यंत वाट बघू आणि नंतर पक्षाच्या इच्छुकांना अर्ज वितरित करण्यास सुरुवात करू असा इशारा जलील यांनी यावेळी दिला आहे.
शिवसेना आणि एमआयएम यांची विचारधारा वेगवेगळी आहे. तरीही राजकीय गरज आणि शेतकरी आणि जनतेचे हित लक्षात घेऊन आम्ही आघाडीला समर्थन देण्यासाठी तयार आहोत. परंतु त्यांनी जर योग्य भूमिका कळविली नाही तर आम्ही इच्छुक उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश देऊ. तसेच विधानसभा निवडणुकीत आमची शक्ती आघाडीला दाखवून देऊ, असा इशारादेखील इम्तियाज जलील यांनी दिला आहे.





