Ishwar Chandra Chandewar : सहकाऱ्यांनी अनेकदा आवाज दिला; दरवाजा आतून बंद, पोलिस घटनास्थळी पोहचले अन् नागपूरातील घटनेने खळबळ
Ishwar Chandra Chandewar : पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर कक्षाचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी डॉ. चांदेवार बेशुद्ध अवस्थेत आढळले. तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

Ishwar Chandra Chandewar : नागपूरच्या धंतोली परिसरातील प्रसिद्ध न्यूरॉन रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. ईश्वरचंद्र नरहरी चांदेवार (वय ४२) यांचा त्यांच्या कक्षात संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कक्षात काही इंजेक्शन आढळून आल्याने इंजेक्शनच्या ओव्हरडोजमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
मानेवाडा येथील शिवशक्तीनगर परिसरात राहणारे डॉ. चांदेवार हे आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण घेतलेले असून न्यूरॉन रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. सोमवारी सकाळी त्यांनी रुग्णालयातील नेहमीची कामे पूर्ण केली. त्यानंतर ते विश्रांतीसाठी त्यांच्या कक्षात गेले. मात्र, बराच वेळ उलटल्यानंतरही ते बाहेर न आल्याने सहकाऱ्यांना संशय आला.
हेही वाचा : Shiv Sena (UBT) : “पैशांचा माज एक दिवस फडणवीस यांनाही अडचणीत आणेल”; ‘उबाठा’चा घणाघात, सगळचं काढलं
सहकाऱ्यांनी अनेकदा आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा आतून बंद असल्याने अखेर धंतोली पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर कक्षाचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी डॉ. चांदेवार बेशुद्ध अवस्थेत आढळले. तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
इंजेक्शनच्या ओव्हडोजमुळे मृत्यू?
घटनास्थळी काही संशयास्पद इंजेक्शन आढळल्याने इंजेक्शनच्या ओव्हरडोजची शक्यता तपासली जात आहे. मात्र, कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नसल्याने मृत्यूमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असून नातेवाइकांचीही चौकशी करण्यात येत आहे.
मृत्यूच्या कारणाविषयी अनेक तर्कवितर्क
दरम्यान, रविवारी रात्री डॉ. चांदेवार यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी तणावातून आत्महत्येचे पाऊल उचलले की इंजेक्शनचा ओव्हरडोज झाला, अथवा झोपेत हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला, याबाबतचे चित्र शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत या प्रकरणाबाबत विविध शक्यतांचा तपास सुरू असून संपूर्ण नागपुरात या घटनेमुळे खळबळ उडाली.
कौटुंबिक कलह?
ईश्वरचंद्र यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. २००८ मध्ये केरळ येथील ज्योसमी उर्फ अनु यांच्याशी डॉ. चांदेवार यांचा प्रेमविवाह झाला होता. शिक्षण घेत असताना त्यांची एकमेकांसोबत ओळख झाली. त्यानंतर ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. कौटुंबिक कलहातून त्यांनी जीव दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.





