इम्रान खान लवकरच कालबाह्य होतील; पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे भाकित

इस्लामाबाद : माजी पंतप्रधान इम्रान खान हे प्रमुख असलेला पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ हा पक्ष आपल्या हिंसाचाराच्या राजकारणामुळे लवकरच कालबाह्य होईल, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. एप्रिल २०२३ पासून विविध गुन्ह्यांच्या प्रकरणात तुरुंगात असलेले इम्रान खान यांना तुरुंगातून सोडावे, या मागणीसाठी पीटीआयने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हे प्रकरण लवकरच निवळेल आणि पीटीआयच्या हिंसक राजकारणाबरोबरच हा पक्ष देखील कालबाह्य होईल, असे ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे.
पीटीआयचे वर्तन राजकीय नसून काहीही असल्याचे आसिफ यांनी म्हटले. हे काहीही वर्तन आता लोकांसमोर उघडे पडले आहे. पीटीआयचे राजकारण केवळ एका व्यक्तीसाठी केले जाते आहे. सत्ता गमावल्यानंतर पीटीआय केवळ आपल्या जखमा कुरवाळत बसली असून कारस्थाने करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या लष्कराला पीटीआयचाच भाग बनवण्याचा प्रयत्न पीटीआयकडून केला जातो आहे. इम्रान खान यांचे लष्कर प्रमुखांशी चांगले घनिष्ठ संबंध होते. आता मात्र पीटीआय पक्ष आणि पक्षाच्या समर्थकांकडून लष्कराविरोधात चुकीची भाषा वापरली जात असल्याची टीकाही आसिफ यांनी केली.





