Imran Khan: “मी जिवंत परत येऊ शकणार नाही…”; पाकिस्तानाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं जेलमधून न्यायाधीशांना वेदनादायी पत्र
Imran Khan: फार उशीर होण्यापूर्वी न्याय देण्याची इम्रान खान यांची मागणी

Imran Khan: पाकिस्तानाचे माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात असून त्यांनी स्वत:च्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करत पत्र लिहिले आहे. यात इम्रान खान यांनी त्यांना आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना योग्य उपचार दिला जात नसल्याचा आरोप केला.
मी आपलं संपूर्ण जीवन हॉस्पिटल बनवण्यासाठी खर्ची लावलं, जेणेकरून ज्या लोकांना उपचाराचा खर्च उचलता येत नाही त्यांना मोफत उपचार मिळू शकतील. आज मला एवढचं वाटतं, माझी पत्नी आणि मला उपचार मिळावेत. माझ्या पत्नीची कमजोर होणारी नजर आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन न होणे यातून मला पत्र लिहिण्यास भाग पडलं, असे म्हणत इम्रान खान यांनी आपल्या वेदना मांडल्या आहेत.
त्यांच्या उजव्या डोळ्याची ८५ टक्के दृष्टी गेली आहे. त्यांना ब्रेन हॅमरेज किंवा कार्डिअक अरेस्टचा धोका आहे. तसेच एका शस्त्रक्रियेनंतर बुशरा यांच्या डोळ्यांची दृष्टी सतत कमी होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
इम्रान यांनी या सर्व गोष्टी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात नमूद केल्या आहेत. त्यांचे वकील बॅरिस्टर सलमान सफदर यांनी हे पत्र ‘एक्स’वर शेअर करत लिहिले, ‘माजी पंतप्रधानांनी त्यांच्या गोष्टी न्यायाधीशांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले होते.’
सोमवारी पाकिस्तानच्या फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट, सर्वोच्च न्यायालय आणि इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात ‘७४ व्या वर्षी, हे कठोर वर्तन मला अशा स्थितीत ढकलत आहे, जिथून मी जिवंत परत येऊ शकणार नाही,’ असे इम्रान खान यांनी लिहिले आहे.
इम्रान यांनी पत्रात आणखी काय सांगितले?
माजी पंतप्रधानांना ५ ऑगस्ट २०२३ रोजी तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना १७ जानेवारी २०२५ रोजी एका वेगळ्या प्रकरणात अटक करण्यात आली. इम्रान यांचा आरोप आहे की, त्यांना वैद्यकीय सुविधा दिली जात नाही. त्यांना ब्रेन हॅमरेजचा धोका आहे. ते एका अंधाऱ्या कोठडीतून लिहीत आहेत. हाच एकमेव मार्ग आहे, ज्यामुळे माझा आवाज या भिंतींच्या बाहेर जाऊ शकतो.
इम्रान यांना दिवसातून २२ तासांपर्यंत एकांतवासात ठेवले जात होते असा आरोप करण्यात येत आहे. या काळात त्यांना कुटुंब, वकील किंवा परदेशात राहणाऱ्या त्याच्या मुलांशी संपर्क साधण्यास मनाई होती. त्यांना पुस्तके आणि टीव्ही वापरण्यासही मनाई होती. दीर्घकाळच्या एकांतवासामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे.
तुरुंगाच्या वैद्यकीय मंडळाने त्यांची अस्वस्थता आणि चिंता लक्षात घेऊन त्याच्या कुटुंबाशी अधिक संपर्क ठेवण्याची शिफारस केली होती परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही असा इम्रान खान यांचा आरोप आहे.
ब्रेन हॅमरेज आणि कार्डिअक अरेस्टचा धोका
पुढे इम्रान यांनी सांगितले की, १० नोव्हेंबर रोजी त्यांचे ब्लड प्रेशर वाढून १९३ दरम्यान पोहोचले होते. डॉक्टरांनी त्यांना ताकीद दिली होती. त्यांना ब्रेन हॅमरेज आणि कार्डिअक अरेस्टचा धोका आहे. त्यांच्या हृदयाला यापूर्वीच नुकसान पोहोचले आहे. बुशरा यांच्या प्रकृतीबद्दलही ते खूप चिंतेत आहेत. जेव्हा मी बुशरा यांना पाहिले, तेव्हा त्या ना प्रकाशाचा त्रास सहन करू शकत होत्या, ना आपले डोळे उघडू शकत होत्या. जर त्यांची आणखी एक शस्त्रक्रिया झाली नाही, तर त्या कायमच्या आपल्या डोळ्यांची दृष्टी गमावू शकतात.
” गरिबांसाठी आयुष्यभर रुग्णालये उभारली, पण आज…”
ते म्हणाले की, मी माझे संपूर्ण आयुष्य रुग्णालये उभारण्यात घालवले, जेणेकरून जे लोक उपचारांचा खर्च उचलू शकत नाहीत, त्यांना मोफत उपचार मिळू शकतील. आज मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, माझी आणि माझ्या पत्नीची वैद्यकीय काळजी घेतली जावी. दीर्घकाळ एकटे राहिल्यामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम झाला आहे. तुरुंगाच्या स्वतःच्या मेडिकल बोर्डाने चिंता नोंदवली होती.
इम्रान खान यांनी पत्राद्वारे न्यायाधीशांना अशी विनंती केली आहे की, प्रकृती आणखी बिघडण्यापूर्वी त्यांनी यात हस्तक्षेप करावा. मी जिवंत असेपर्यंतच आपली निर्दोषता सिद्ध करू शकू. मी तुम्हाला मानवतेच्या सर्वात मूलभूत आधारावर विनंती करतो, मला फार उशीर होण्यापूर्वी न्याय द्यावा,” असे आवाहन इम्रान खान यांनी पत्राद्वारे केले आहे. सध्या त्यांचे हे वेदनादायी पत्र चर्चेत आले आहे.
हेही वाचा:
Pune News: जागा महापालिकेकडे, भुर्दंड मूळ मालकांना!





