लोकसंख्येच्या विविध मापदंडांमध्ये सुधारणा : डॉ. बलराम बार्गव

मुंबई – 2019-21 या कालावधीतल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार देशात अलीकडच्या काळात लोकसंख्येच्या विविध मापदंडांमध्ये सुधारणा झाली आहे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक,प्राध्यापक बलराम भार्गव यांनी केले आहे. मात्र कोविड 19 सारखे नव्याने उद्भवणारे संसर्गजन्य रोग आपल्यापुढे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करतात असे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचा दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावर्षी 255 विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या. संशोधन आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदके प्रदान करण्यात आली.
राष्ट्रीय स्तरावर नियोजन आणि धोरण निर्मिती करता या क्षेत्रात उच्च गुणवत्तेच्या अधिकाधिक संशोधनाची आवश्यकता आहे तसेच लिंग, सामाजिक आणि प्रादेशिक असमानतांनुसार असलेली तफावत मोजणे महत्वाचे आहे, असे मत प्राध्यापक भार्गव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
भारत सरकारचे माजी प्रमुख वैज्ञानिक सल्लागार आणि बेंगळुरू इथल्या राष्ट्रीय जैविक विज्ञान केंद्रातील मानद प्राध्यापक डॉ. के. विजय राघवन,यांनी आपल्या भाषणात आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध सरकारी कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत आणि त्या उपक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले.
जैवविविधतेचा ऱ्हास, हवामान बदल, उच्च गुणवत्तेच्या शिक्षणातील फरक, श्रमशक्तीचा सहभाग, विविध रोग, युद्ध , श्रीमंत आणि गरीब देशांमधील विकासातील प्रचंड तफावत यामुद्द्यांवर डॉ राघवन यांनी भर दिला. ज्ञान, संशोधन आणि प्रशिक्षण हे त्यांच्या कॅम्पसपुरते मर्यादित न राहता ते देशातील दुर्गम भागात असलेली महाविद्यालये आणि विद्यापीठांपर्यंत पोहोचले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.





