मुंबई – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या कमालीच्या उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात शेअर बाजारात खरेदी विक्रीच्या अनेक लाटा येऊन गेल्या. या पार्श्वभूमीवर गुरुवारी शेअर बाजार निर्देशांकात जवळजवळ अर्धा टक्का वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक या निर्देशांकाशी संबंधित महत्त्वाच्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांक सुधारण्यास मदत झाली. काल शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळले होते. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 358 अंकांनी वाढून 70,865 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 104 अंकांनी म्हणजे 0.50 टक्क्यांनी वाढून 21,205 अंकावर बंद झाला. सकाळी शेअर बाजार निर्देशांकात बरीच घट झाली होती. मात्र दुपारी बरीच खरेदी झाल्यामुळे निर्देशांक वाढण्यास मदत झाली. आज झालेल्या खरेदीचा फायदा ऊर्जा, धातू, बँकिंग क्षेत्रासह इतर क्षेत्रांनाही झाला. एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या दोन मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात सुधारणा झाल्यामुळे मुख्य निर्देशांक वाढण्यास मदत झाली. पावर ग्रीड, एचडीएफसी बँक, कोटक बँक, स्टेट बँक, टाटा स्टील, एनटीपीसी, एअरटेल या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला. मात्र बजाज फायनान्स, अॅक्सिस बँके, महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात ख्रिसमस आहे, त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार सध्या मंद गतीने वाटचाल करीत आहेत. आज संध्याकाळी अमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जाहीर होणार होती. अशा परिस्थितीत परदेशी गुंतवणूकदार फारसे सक्रिय नव्हते. काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 1,322 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मात्र देशातील गुंतवणूकदारांनी सध्याच्या परिस्थितीत खरेदी करून निर्देशांक वाढते ठेवण्यास मदत केली. मुंबई शेअर बाजाराचा स्मॉल कॅप 1.69 टक्क्यांनी तर मिडकॅप 1.61 टक्क्यांनी वाढले. दूरसंचार, ऊर्जा, तेल व नैसर्गिक वायू या क्षेत्राच्या निर्देशांकात वाढ झाली. तर वाहन क्षेत्राच्या निर्देशांकात घट झाली. सध्या खनिज तेलाचे दर वाढून 80 डॉलर प्रति औंस या पातळीपर्यंत गेले आहेत. यामुळे गुंतवणूकदार बरेच सावध असल्याचे वातावरण आहे. 00000