Share Market : शेअर निर्देशांकात सुधारणा

मुंबई – शेअर बाजार निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात खरेदी-क्रीच्या लाटा चालू आहेत. आजही सकाळपासून खरेदीबरोबरच विक्री होत होती. मात्र दिवसाखेर शेअर बाजार निर्देशांकात काही प्रमाणात वाढ झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 226 अंकांनी वाढून 55,555 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.28 टक्क्यांनी म्हणजे 45 अंकांनी वाढून 16,496 अंकांवर बंद झाला.
टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिन्सर्व, नेस्ले, एअरटेल, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा या कंपन्यांनी आजच्या तेजीचे नेतृत्व केले. मात्र अल्ट्राटेक सिमेंट, पावर ग्रिड या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागेल.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी झाल्यामुळे आज शेअर बाजार निर्देशांकांना आधार मिळाला असे रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक आज 1.8 टक्क्यांनी वाढला. आशियाई शेअर बाजाराबरोबरच युरोपातील शेअर बाजारातून सकाळी सकारात्मक संदेश झाल्यानंतर भारतात गुंतवणूकदारांनी खरेदी करणे पसंत केले.
रुपयाचे मूल्य आज 17 पैशानी वाढल्यामुळे शेअर बाजारात उमेदीचे वातावरण तयार झाले होते. भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात अधिक सकारात्मक होणार असल्याचे क्रीसील या पतमानांकन संस्थेने आपल्या अहवालात सांगितल्या नंतर गुंतवणूकदारांनी खरेदी केली असल्याचे दिसून आले.
माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, उर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू व बॅंकिंग क्षेत्राचे निर्देशांक सव्वा टक्क्यांपर्यंत वाढले तर धातू, वाहन, रिअल्टी, आरोग्य क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले. मुख्य निर्देशांकात वाढ होत असली तरी मिड कॅप आणि स्मॉल कॅप दिड टक्क्यापर्यंत कमी झाले. गेले आठवड्यातही हे निर्देशांक बरेच कमी झाले होते





