प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीसाठी मतदानास अवघे दोन दिवस शिल्लक आहेत.त्यामुळे मतदारांपर्यंत वोटर स्लीप देण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असले तरी विधानसभेच्या तुलनेत मतदान केंद्राची संख्या अधिक असल्याने अनेक मतदारांना अद्यापही नावे सापडत नाहीत. त्यामुळे मतदानाला जाण्यापूर्वी नागरिकांनी महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या संकेत स्थळावर भेट देऊन आपले नाव तसेच मतदान केंद्राची माहिती घेऊन बाहेर पडावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक केंद्रावर सुमारे १२०० ते १४०० मतदार होते. मात्र, आता पालिका निवडणुकीसाठी ८०० ते ९०० मतदारांचे केंद्र आहे. त्यामुळे एकाच भागातील नागरिक तसेच एकाच कुटुंबातील नागरिकांची नावे वेगळेवगळ्या मतदान केंद्रावर गेलेली आहेत. त्यामुळे मतदारांनी बाहेर पडताना आपले नाव शोधून बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. pmcvotersearch.digielection.com या संकेतस्थळावर शोधता येईल आपले नाव.