Dilip Walse Patil : आंबेगाव, जुन्नर तातडीने दुष्काळी तालुके जाहीर करा
Dilip Walse Patil : जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रब्बी हंगामही अडचणीत येण्याची शक्यता आहे. आगामी काळात जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

मंचर : राज्य शासनाने २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर या आदिवासी व डोंगरी तालुक्यांचा त्यात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांना तातडीने दुष्काळी तालुके जाहीर करून दुष्काळी सवलती लागू कराव्यात,अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी शासनाकडे केली आहे.
वळसे-पाटील यांनी गेल्या तीन दिवसांत आंबेगाव व जुन्नर तालुक्याचा पाहणी दौरा केला. पावसातील मोठ्या खंडामुळे खरीप पिकांना फटका बसला असून भात, सोयाबीन, बाजरी, मूग व उडीद पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रब्बी हंगामही अडचणीत येण्याची शक्यता आहे. आगामी काळात जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, कृषीमंत्री, मदत व पुनर्वसनमंत्री तसेच प्रधान सचिवांना पत्र पाठवून तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात पावसातील खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून आगामी काळात चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे दोन्ही तालुके तातडीने दुष्काळी जाहीर करावेत.
– दिलीप वळसे-पाटील, माजी गृहमंत्री.





