IMD Alert – राज्यातील दक्षिण मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. तर पुढील दोन दिवस पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात एक ते दोन अंशाने घट झाली असून, रविवारी (दि. १५) अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम होती. आज अमरावती येथे उष्णतेचा पारा ४०.६ अंशावर पोहचला. मराठवाड्यापासून उत्तर कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावत उन्हाच्या वाढत्या चटक्यावर काहीशा दिलासा दिला. मात्र, या पावसामुळे शेतकऱ्यांसह कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. राज्यात पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडले. त्यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात मेघगर्जना आणि ताशी ३० ते ४० वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच रायगड रत्नागिरी, सिंधूदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, अहिल्यानगर परभणी, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून, या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. परिणामी पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात दोन ते चार अंशाने घट होईल. पुण्यात ढगाळ वातावरण शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात एक ते दोन अंशाने घट झाली. त्यामुळे मागील आठवडाभरापासून उन्हाच्या झळांनी होणारी अंगाची लाहीलाही आज कमी झाली. आज शहरातील लोहगाव येथे सर्वाधिक ३८.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर शहराच्या मध्यवर्ती भागातील तापमानातही दोन अंशाने घट झाल्याने पारा ३५ अंशापर्यंत खाली आला. शहरासह जिल्ह्यातील घाट विभागात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.