illegal liquor raids : जिल्ह्यात अवैध दारू अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक; ५ दिवसांत ४२ छापे, ३४ जण गजाआड
illegal liquor raids : पुणे परिसरात विषारी दारूमुळे घडलेल्या घटनेनंतर राज्यात हाय अलर्ट; साताऱ्यात २९ मे ते २ जून दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाची विशेष मोहीम.

illegal liquor raids – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधातील विशेष मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाच दिवसांत 42 कारवाया करून, 34 जणांना अटक केली आहे. या छाप्यांमध्ये देशी-विदेशी मद्यासह अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे परिसरात विषारी दारू पिल्याने, घडलेल्या घटनेनंतर राज्यात अवैध मद्य व्यवसायांविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने 29 मे ते 2 जून या कालावधीत सातारा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये छापेमारी करून, हातभट्टीची दारू, ताडी आणि इतर मद्यसाठे जप्त केले. या मोहिमेत 451 लिटर हातभट्टी, 853 लिटर ताडी, देशी-विदेशी मद्यासह एकूण दोन लाख 48 हजार 785 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि कोल्हापूर विभागाचे उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या निर्देशानुसार सातारा जिल्ह्याचे अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथकांनी या कारवाया केल्या.
अवैध व भेसळयुक्त मद्यापासून नागरिकांनी दूर रहावे. अशा मद्यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यात कुठेही बेकायदेशीर मद्यनिर्मिती, वाहतूक अथवा विक्री सुरू असल्यास, नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 किंवा व्हॉटस्अॅप क्रमांक 8422001133 वर कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




