Case of poisonous alcohol : विषारी दारू प्रकरणात मोठी कारवाई! मुख्य आरोपीशी संबंधांचा संशय; आणखी चार पोलिसांचे निलंबन
Case of poisonous alcohol : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 22 वर पोहोचली आहे. तपासादरम्यान ही विषारी दारू फुगेवाडी परिसरात तयार केली जात असल्याचे समोर आले आहे.

Case of poisonous alcohol : पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस दलातील आणखी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील निलंबित अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या आता 29 वर पोहोचली आहे.
प्राथमिक चौकशीत विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याच्याशी काही पोलीस कर्मचाऱ्यांचे संपर्क असल्याचे उघड झाल्याने ही कारवाई करण्यात आली. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये अजित शिवाजी काळे (पोलीस हवालदार, उरुळी कांचन), सुमीत नंदकुमार वाघ (पोलीस अंमलदार, उरुळी कांचन), रामदास ज्ञानदेव जगताप (पोलीस हवालदार, यवत) आणि सुभाष बलभीम डोईफोडे (पोलीस हवालदार, दौंड उपविभागीय कार्यालय) यांचा समावेश आहे.
२९ पोलिस सस्पेंड
या प्रकरणात आतापर्यंत पुणे शहर पोलीस दलातील 3, पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील 6, राज्य उत्पादन शुल्क विभागातील 13 आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील 7 अशा एकूण 29 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा : Satara: सातारा जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट धरणसाठा तळाला, अनेक भागांत कपातीचे संकट
राज्यभरात धडक कारवाई
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 22 वर पोहोचली आहे. तपासादरम्यान ही विषारी दारू फुगेवाडी परिसरात तयार केली जात असल्याचे समोर आले आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून अनेक जिल्ह्यांमध्ये हातभट्टी दारूविरोधात विशेष मोहीम राबवत पोलिसांकडून धडक कारवाया सुरू आहेत.
अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेत निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांना केवळ निलंबित न करता सहआरोपी करण्याची मागणी केली. “फक्त निलंबन करून चालणार नाही. या बेकायदेशीर धंद्याची माहिती असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.





