Junnar illegal liquor: जुन्नरमध्ये गावठी दारूचे अड्डे पुन्हा सुरू! पोलिसांचा धडाका की केवळ तात्पुरता दिखावा?
Junnar illegal liquor: विषारी दारू प्रकरणानंतरची प्रशासकीय आक्रमकता थंडावली; जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी आणि जाधववाडी परिसरात हातभट्ट्या पुन्हा सक्रिय.

Junnar illegal liquor – विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभर अवैध हातभट्ट्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या. जुन्नर तालुक्यातही राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने अनेक ठिकाणी धाडी टाकून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. मात्र, काही काळ उलटल्यानंतर या कारवाईचा प्रभाव कितपत टिकला, याबाबत आता नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
तालुक्यातील धनगरवाडी, जाधववाडी तसेच मावळ पट्ट्यातील काही भागांत गावठी दारूची निर्मिती आणि विक्री पुन्हा सुरू झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे कारवाईनंतर काही दिवस शांतता आणि त्यानंतर पुन्हा अवैध व्यवसाय सुरू होतो कसा, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, अवैध दारू व्यवसाय रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना कठोर सूचना दिल्या होत्या.
तसेच गावपातळीवरही जबाबदार्या निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी प्रत्यक्षात होत आहे का, याबाबत नागरिक साशंक असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील काही हॉटेल्स आणि ढाब्यांमध्येही नियमबाह्य पद्धतीने मद्यविक्री होत असल्याच्या तक्रारी अधूनमधून समोर येत आहेत. कारवाई होत असली तरी त्यातून कायमस्वरूपी प्रतिबंध होत नसल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ हातभट्ट्या उद्ध्वस्त करणे किंवा किरकोळ गुन्हे दाखल करणे पुरेसे ठरणार नाही. या व्यवसायामागील मुख्य सूत्रधार, आर्थिक साखळी आणि त्यांना मिळणार्या संभाव्य संरक्षणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. विषारी दारू प्रकरणानंतर प्रशासनाने घेतलेली आक्रमक भूमिका दीर्घकाळ कायम राहणार की ती केवळ तात्पुरती मोहीम ठरणार, याकडे आता जुन्नर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.





