Illegal Gas Refilling – परिसरात घरगुती गॅसची टंचाई असताना त्याचा गैरफायदा घेत अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणार्या टोळीचा चाकण उत्तर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडीत तिघांना अटक करण्यात आली असून तब्बल 49 लाख 57 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे यांना गुप्त माहिती मिळाली की भोसे गावच्या हद्दीत गॅस टँकरमधून अवैधपणे गॅस भरला जात आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. 31 मार्च रोजी पहाटे सुमारे 4.40 वाजता चाकण-शिक्रापूर रोडवरील इंडेन कंपनीच्या पार्किंगमध्ये पोलिसांनी छापा टाकला. यावेळी गॅस टँकरचे आउटलेट सील तोडून कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता घरगुती सिलिंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. या कारवाईत अंबादास रोहिदास गाडे (वय 42, रा. चेंबूर, मुंबई), अक्षय रमेश मुंगसे (वय 25, रा. रासे, ता. खेड) आणि नवनाथ अंकुश होजगे (वय 34, रा. भोसे, ता. खेड) यांना अटक करण्यात आली. घटनास्थळावरून गॅस टँकर, रिफिलिंग साहित्य आणि गॅस असा एकूण 49 लाख 57 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा अवैध व जीवघेण्या व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.