प्रभात वृत्तसेवा पिंपरी – घरगुती गॅसची चोरी करून तो इतर सिलेंडरमध्ये भरत असल्याच्या कारणावरून तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास भोसरी येथील धावडेवस्ती भागात असलेल्या बाबा आनंद मंगल कार्यालयाजवळील प्रकाश गॅस सर्व्हिसेस दुकानात उघडकीस आली.मंगेश दिगंबर भोयर (वय ३४, रा. अंकुशनगर, भोसरी) असे गुनहा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट एकमधील पोलीस हवालदार महादेव गजेंद्र जावळे (वय ४३) यांनी शुक्रवारी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे आवश्यक परवाना नसतानाही ज्वालाग्राही पदार्थाच्या साठवणुकीसंबंधी कोणतीही सुरक्षितता न बाळगता गॅस भरण्याचा प्रकार सुरू होता. याबाबत माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा घालून हा प्रकार उघडकीस आणला. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.