IIM Campus: पुण्यात आयआयएमचे भव्य कॅम्पस! मोशी येथे मिळणार २८ हेक्टर मोफत शासकीय जमीन
IIM Campus: आयआयएम नागपूरच्या वतीने पुण्यात जागतिक दर्जाचे शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण कॅम्पस उभारले जाणार; उच्च शिक्षणाला मिळणार गती.

IIM Campus – पिंपरी- चिंचवडमधील मोशी येथे भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच आयआयएम नागपूरच्या वतीने एक जागतिक दर्जाचे शैक्षणिक व प्रशिक्षण कॅम्पस उभारले जाणार आहे. त्यासाठी मोशी येथील २८ हेक्टर शासकीय जमीन महसूलमुक्त आणि भोगवटामूल्यरहित म्हणजेच कोणत्याही शुल्काशिवाय देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून,
त्यामुळे व्यवस्थापन शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण आणि उद्योग-संलग्न कौशल्य विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या निर्णयानुसार मोशी (ता. हवेली) येथील २८ हेक्टर शासकीय जमीन आयआयएम नागपूरला शैक्षणिक व प्रशिक्षण कॅम्पस उभारण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या जमिनीचे प्रचलित बाजारमूल्यानुसार निर्धारित करण्यात आलेले १८६ कोटी रुपये इतके भोगवटामूल्य माफ करण्यात येणार आहे. मात्र, ही रक्कम राज्य शासनाचे भागभांडवल म्हणून संस्थेच्या अधिकृत भागभांडवलात समाविष्ट करण्यात येणार असून, त्यानंतर जमीन आयआयएम नागपूरला महसूलमुक्त व भोगवटामूल्यरहित स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला शिक्षण, उद्योग आणि कौशल्य विकासाचे अग्रगण्य केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट ठेवून शासन काम करत आहे. आयआयएमसारख्या राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थेला पुणे परिसरात शैक्षणिक व प्रशिक्षण कॅम्पस उभारण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना आणि युवा पिढीला जागतिक दर्जाच्या शिक्षण व प्रशिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होतील. या प्रकल्पामुळे उच्च शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योगाभिमुख कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे.





