ना कसली ओळख, ना कसला दंड! ‘आमदार’ स्टिकरमुळे गाडीला मिळतेय अभय; पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्याचे शिरूर-आंबेगाव व शिरूर-हवेली असे विभाजन झाल्यानंतर शिरूर तालुक्याला सन २००९ सालापासून दोन आमदार लाभले आहेत. जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदाराला एक वेगळे वलंय असते. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिरूर तालुक्यामध्ये “आमदार” नावाचा स्टिकर चार चाकी गाडीला चिटकून कुणीही फिरत असल्याने आमदार नावाचे वलयच कमी झाले आहे.
पुणे-नगर महामार्ग सह रांजणगाव एमआयडीसी परिसरात, पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा सणसवाडी शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, कारेगाव, सरदवाडी, शिरूर शहर या पट्ट्यामध्ये चार चाकी गाड्यांना “आमदार” नावाचे स्टिकर लावून फिरणारे अनेक स्वयंघोषित नेते तयार झाले आहेत.
या नेत्यांवरती कुठल्याही पक्षाचा, पक्षाच्या तालुका अध्यक्षांचा, व आमदारांचा वचकच राहिलेला दिसून येत नाही. किंवा या स्वयंघोषित नेत्यांना “आमदार” या पदाची गरिमाच माहिती झाली नाही असेच म्हणावे लागेल.
त्यातच भर म्हणजे अवघ्या पुणे नगर महामार्गावर वाहतूक नियंत्रण करणाऱ्या वाहतूक नियंत्रण पोलिसांना, व शिक्रापूर रांजणगाव व शिरूर पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाच्या पोलिसांना या गाड्याच दिसत नाही का? कारण अवघ्या पुणे- नगर महामार्गावर “आमदार” स्टिकर लावलेल्या एक दोन तरी गाड्या या दिवसभरात प्रवास करत असतात.
मात्र पोलीस याकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात एखाद्या दुचाकीला कुणी आमदाराचे स्टिकर लावून फिरला तर वावगे ठरणार नाही. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्याशी संपर्क साधला असता रांजणगाव एमआयडीसी, शिक्रापूर व शिरूरच्या वाहतूक विभागाला सदर वाहनांवरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील असे सांगितले.





