पोलीस आयुक्तांचे महापालिकेच्या मर्मावर बोट; पावसाळ्यापूर्वी शहरातील अतिक्रमणे, खड्डे हटवा

पुणे – मागील वर्षी बेसुमार रस्ते खोदाई आणि अपुऱ्या रस्तेदुुरुस्तीमुळे शहरात ऐन पावसाळ्यात रस्त्यांवर अडथळ्यांची शर्यतीला तोंड द्यावे लागले होते. शहरभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण आला होता. प्रशासनावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी यंदा महापालिकेच्या या मर्मावर बोट ठेवत, पावसाळ्यापूर्वी पालिकेने काय उपाय योजना कराव्यात याचे भलेमोठे पत्रच आयुक्त विक्रम कुमार यांना पाठविले आहे.
यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पोलीस प्रशासन सतर्क झाले असून पावसाळ्यात शहरात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आता थेट पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनीच पावसाळ्यापूर्वी महापालिकेने काय उपाय योजना कराव्यात याचे भलेमोठे पत्रच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पाठविले आहे. तसेच सुचविलेल्या उपाय योजना तातडीनं करून पावसाळ्यातील कोंडी टाळावी तसेच पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही, यासाठी सूचना केल्या आहेत.
आयुक्त रितेश कुमार यांनी पाठविलेल्या या पत्रात रस्ते खोदाई, मेट्रो, शहारातील रस्त्यावरील अतिक्रमणे, पावसाळी साफसफाई, सिंग्नल यंत्रणा, चुकीच्या पद्धतीने केली जाणारी विकासकामे यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या तसेच त्यावरील उपायही महापालिकेस या दोनपानी पत्रात कळविले आहेत. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून शहरातील पावसाळापूर्व कामे पूर्ण झाली असून यंदा पावसाळ्यात शहरात पाणी साठणार नाही तसेच वाहतूक कोंडीही होणार नसल्याचा दावा आधीच केलेला आहे. या शिवाय, काही दिवसांपूर्वी याच विषयावर पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत शहरात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अतिरिक्त ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी, पुन्हा थेट पोलीस आयुक्तांनीच पत्र पाठविल्याने हे पत्र चांगलाच चर्चेचा विषय बनले आहे.
अशा आहेत पोलीस आयुक्तांच्या सूचना व तक्रारी
- शहरातील वॉटर लॉगिंगच्या ठिकाणांची व ड्रेनेजच्या झाकणांची पाहणी करा.
- रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी करुन तत्काळ दुरुस्ती करावी
- कामाकरीता खोदलेले रस्ते तत्काळ दुरुस्त करावेत
- मेट्रोच्या कामानंतर खोदलेले रस्ते दुरूस्त नाहीत
- मेट्रोच्या कामाचा राडारोडा तसाच पडून
- मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावरही बॅरीकेड्स आणि मशिनरी तत्काळ बाजूला हटवावी.
- तुटलेली चेंबराची झाकणे दुरूस्त करावीत
- मध्यवस्तीमधील रस्त्यावरील अतिक्रमणे तत्काळ काढावीत
- अनधिकृत फेरीवाले, पथारीवाले यांच्यावर दैनंदिन कारवाई करावी
- पदपथ पादचाऱ्यांसाठी रिकामे करावेत.
- शहरात गर्दीच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी
- शहरात येणाऱ्या प्रमुख चौकांचे रूंदीकरण तातडीन करावे
- मेट्र, महापालिका, पोलिसांची संयुक्त बैठक घ्यावी





